ं
डोंबिवली : केंद्र, राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत त्याची जनतेला माहिती देण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातर्फे डोंबिवली, कल्याणमध्ये ‘चला होऊ द्या चर्चा’ हा चौक सभांचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम केंद्र, राज्य सरकारच्या भूमिका, धोरणे आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवित असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी डोंबिवली, कल्याणमधील या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
डोंबिवलीत गेल्या सात दिवसाच्या काळात पश्चिम भागात ‘उबाठा’तर्फे आयोजित चौक सभांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढती महागाई, दुर्बल घटकांसाठी केलेल्या घोषणा आणि त्याची अंमलबजावणी, घरगुती सिलिंडरचे वाढते दर, उज्वला योजनेतून सिलिंडर घेणाऱ्या दुर्बल घटकातील नागरिकांची केंद्र सरकारकडून होणारी फसवणूक, अशा अनेक विषयांवर ‘उबाठा’चे डोंबिवलीतील स्थानिक पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : पथदिवे बंद असल्याने डोंबिवलीतील ठाकुर्ली पूल ते गणेशनगर रस्ता अंधारात
उल्हासनगर मधील एका कार्यक्रमात एका सामान्य कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपशब्द वापरले. ठाण्यात चौक सभांच्यावेळी शिवसेना आणि ‘उबाठा’ पक्षाचे शिवसैनिक आमने-सामने आले. या चौक सभांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी डोंबिवली, कल्याणमधील ‘उबाठा’च्या चौक सभांना परवानगी नाकरली.
जनतेमध्ये जागृती करणाऱ्या अशा सभांना परवानगी नाकारून सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडवित आहे. लोकांच्या हक्कावर गदा आणत आहे. घटनाकारांनी जनतेला दिलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या मंदिरात होतोच, पण तो प्रयत्न आता बाहेरही सुरू झाला आहे. हे आदर्शवत लोकशाहीचे लक्षण नव्हे, अशी टीका ‘उबाठा’चे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी मूकमोर्चादरम्यान केली.
हेही वाचा : विश्लेषण : भिवंडीची कोंडी कधी फुटणार?
‘उबाठा’तर्फे डोंबिवलीत शिवसेना शाखा ते इंदिरा चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा रविवारी सायंकाळी काढण्यात आला. काळ्या फिती लावून, मशाल पेटवून शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. सरकारच्या हुकुमाशी प्रवृत्तीचा यावेळी निषेध करण्यात आला. शिवसेनेचे सदानंद थरवळ, तात्यासाहेब माने, वैशाली दरेकर, विवेक खामकर या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. डोंबिवली पूर्व भागात शनिवार ते शुक्रवारपर्यंत चौक सभांचे नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हे कार्यक्रम रद्द झाले आहेत. लवकरच अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन करुन जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जातील, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.