कल्याण – पाऊस तोंडावर आल्यामुळे ३१ मे पूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप झाल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून ही कामे प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. निविदा प्रक्रियेत रस्त्यांवर खड्डे भरण्याची कामे अडकल्याने पाऊस उंबरठ्यावर आला तरी मे महिन्यापूर्वी करावयाची खड्डे भरणीची कामे अद्याप प्रशासनाने हाती घेतली नाहीत.
पालिकेत नगरसेवक नावाची यंत्रणा नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कोणीही नाही. प्रशासकीय राजवटीमुळे आम्ही करू ती पूर्व दिशा अशा पद्धतीने पालिकेचा मागील तीन वर्षांपासून कारभार सुरू आहे. यापूर्वी पालिकेत स्थानिक वजनदार अधिकाऱ्यांचा दबदबा होता. कामे झाली नाहीत तर नागरिक आपणास जाब विचारतील अशी भीती स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये असायची. स्थानिक अधिकारी पावसाळ्यापूर्वीची नाले, गटार सफाई, खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने करायचे. आता सगळ्या प्रकारचा पसारा प्रशासनात पडला आहे. नाले, चऱ्या, खड्डे भरण्याच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धक ठेकेदारांनी केल्याने ती प्रक्रिया शहर अभियंता विभागाने रद्द केली. नव्याने प्रक्रिया सुरू केली. यात वेळकाढूपणा झाल्याने प्रशासनाला नाले, गटार सफाईची कामे वेळेत हाती घेता आली नाही. ही कामे समर्पित भावाने करणे आवश्यक असताना या कामाचे नियंत्रक शहर अभियंता मे मधील सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रजेवर असल्याचे सांगण्यात आले. प्रभारी पदभार तरुण जुनेजा यांच्याकडे स्मार्ट सिटी कामाचा पदभार आहे. त्यांना पावसाळ्यापूर्वी भरण्यात येणाऱ्या खड्डे कामासाठी संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा – ठाणे : क्लस्टरच्या नावाखाली घरे भरण्याचे काम, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
रस्त्यांवर उतरून हिरीरिने काम करणाऱ्या अभियंत्यांना प्रशासनाने गेल्या वर्षी अडगळीचे विभाग देऊन रस्ते कामातील गतीमध्ये स्वताहून अडथळा आणला. जे अभियंता रस्त्यांवर उतरून काम करत आहेत. त्यांच्याकडे दोन ते तीन अतिरिक्त पदभार आहेत. प्रशासनातील या गोंधळाचा फटका नागरी प्रश्नांना बसत आहे.
हेही वाचा – ठाण्यात १७० एकरवर समूह विकास योजना राबविणे अशक्य – आव्हाड
नगररचनेत चढाओढ
नगररचना विभागात सहा ते सात अभियंत्यांची गरज आहे. या मलईदार खात्यात आजघडीला १४ अभियंते कार्यरत आहेत. प्रशासन एकीकडे रस्त्यावर काम करण्यासाठी अभियंते नाहीत म्हणते. नगररचना विभागात १४ अभियंत्यांची भाऊगर्दी कशासाठी, असे प्रश्न केले जात आहेत. काही अभियंते ५ ते ८ वर्षे नगररचना विभागात ठाण मांडून आहेत. मोजके अभियंते राजकीय दबाव टाकून मलईदार नगररचना विभागात शिरकाव करत असल्याने पालिकेतील वरिष्ठांचा नाईलाज होत आहे. एका वजनदार लोकप्रतिनिधीचा स्वीय साहाय्यक हे सगळे प्रकार करत असल्याची चर्चा आहे. काही अभियंते हट्टाने अमुक विभाग, अमुक टेबल मिळाला पाहिजे असे अडून बसलेत. नगररचना विभागात आज घडीला तीन साहाय्यक नगररचना पदाची पदे आणि इच्छुक अभियंते सहा असे चित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी शासन सेवेतून आलेल्या साहाय्यक नगररचनाकाराला कुंपणावर ठेवण्यात आले आहे. आता एका शासन पदस्थापित कार्यकारी अभियंत्याला दूर करून त्याच्या जागी खानदेशातून राजकीय दबाव आणून एक उपअभियंता प्रभारी कार्यकारी अभियंता होण्यासाठी आटापिटा करत असल्याचे कळते.