कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील केंद्र शाळांकडून शहरातील खासगी शाळांना मोफत पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. केंद्र शाळाचालकांकडून शिक्षकांना पुस्तके घेण्यासाठीचा निरोप देण्यात येतो. शिक्षक तेथे गेल्यावर शिक्षकांना टेम्पोत पुस्तके ठेवण्याची कामे दिली जातात. यामध्ये महिला शिक्षकांनाही सहभागी करून घेतले जात असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक संच देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून आलेली पुस्तके केंद्र शाळेमध्ये ठेवण्यात येतात. एका केंद्र शाळेच्या अधिपत्त्याखाली १० खासगी शाळा येतात. केंद्र शाळा चालकांकडून संबंधित शाळांना आपल्या शाळेची पुस्तके घेण्यासाठी या असा निरोप देण्यात येतो. विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेत मिळाली पाहिजेत म्हणून कल्याण, डोंबिवली, ठाणे, शहापूर, मुरबाड भागातील कल्याण, डोंबिवलीतील शाळांवर नोकरी करणारा शिक्षक मिळेल त्या वाहनाने केंद्र शाळांमध्ये पोहोचतो. यामध्ये महिला शिक्षिका आघाडीवर असतात. महिला शिक्षिका पुस्तके व्यवस्थित शाळेत आणता यावीत म्हणून रिक्षा घेऊन कल्याण, डोंबिवलीतील केंद्र शाळेत पोहोचतात. तेथे गेल्यावर शिक्षकांना केंद्रातील विखुरलेल्या वर्ग खोल्यांमध्ये ठेवलेले पुस्तकांचे गठ्ठे उचलण्याचे काम केंद्र शाळा प्रमुखाकडून सांगितले जाते. अचानक गठ्ठे उचलण्याचे काम सांगितले जात असल्याने शिक्षक नाराज आहेत. महिला शिक्षकांनाही यामधून सूट दिली जात नाही, असे शिक्षकांनी सांगितले.

हेही वाचा – ५० कुठे आणि १०५ कुठे? उल्हासनगरात भाजपाने उडवली शिवसेनेची खिल्ली

शाळा, विद्यार्थी, पुस्तकांचा प्रश्न असल्याने कोणी शिक्षक पुस्तक गठ्ठे उचलण्यास नकार देत नाही. बहुतांशी शिक्षक ५० वयाच्या पुढचे आहेत. काही शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनाही पुस्तकांचे अवजड गठ्ठे केंद्र शाळा चालकांनी उचलण्यास भाग पाडल्याचे शिक्षकांनी सांगितले. सकाळी नऊ वाजता केंद्र शाळेत पोहोचलेले शिक्षक दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या शाळेचा क्रमांक कधी लागेल याची वाट पाहत घामाने निथळत होते. त्यात गठ्ठे उचलण्याची कामे करावी लागत असल्याने प्रत्येक शिक्षक घामाघूम झाला होता.

केंद्र शाळांनी पुस्तके उचलण्यासाठी हमालांची व्यवस्था केली असेल किंवा त्या बदल्यात शाळांकडून हमाली खर्च केंद्र शाळा चालक वसूल करतील असे शिक्षकांना वाटले होते. केंद्र शाळा चालकांनी शिक्षकांना गठ्ठे उचलायचे आहेत तुमच्या शाळेतील शिपाई घेऊन या असा निरोप दिला असता तर प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील शिक्षक गठ्ठे उचलण्यासाठी नेला असता. प्रत्येक शाळेची सुमारे ४०० ते ५०० पुस्तके. नवीन पुस्तके चार भागांमध्ये आहेत. तेवढे गठ्ठे उचलून अनेक शिक्षकांची दमछाक झाली. टेम्पो भाड्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून १०० रुपये आकारण्यात आले. अशाच पद्धतीने हमालीसाठी प्रत्येकाकडून पैसे गोळा केले असते तर शिक्षकांनी ती रक्कम दिली असती, असे शिक्षकांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये दुचाकीस्वारांना लुटणाऱ्यांना आंबिवलीमधून अटक

याविषयी कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी सांगितले, प्रत्येक शाळेला आपली पुस्तके घेऊन जायाचे निरोप दिले होते. पुस्तके नेण्यासाठी संबंधित शाळेतील शिक्षकांनी शाळेतील शिपाई घेऊन येणे आवश्यक होते.

निवडणूक, जनगणना, पशू, श्वान, स्वच्छता गणनेची काम करणाऱ्या शिक्षकांना आता हमालीचीही कामे देण्यात येऊ लागल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan dombivli the task of distributing school books to the teachers ssb
Show comments