कल्याण : कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपली जनसंपर्क, निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय कार्यालये हीच निवडणूक कार्यालये करण्यात आली आहेत. या कार्यालयांच्या बाहेर दररोज सकाळ, संध्याकाळ पक्षीय नेते, पदाधिकारी सार्वजनिक रस्त्यावरील वाहनांचा विचार न करता कार्यालयासमोरील रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी करत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

निवडणूक कार्यालयात आलेल्या नेते, पदाधिकाऱ्याला वाहन बाजुला करून घ्या, असे सांंगण्यास जाणाऱ्या वाहतूक पोलिसाला उलटसुलट उत्तरे मिळण्याची शक्यता असल्याने ते आव्हान न स्वीकारता वाहतूक पोलीस, सेवक आहे त्या परिस्थितीत पक्षीय कार्यालयांसमोरील कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी एका पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होती. यावेळी बहुतांशी पदाधिकाऱ्यांची वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या वाहनांमुळे बस, ट्रक अशी वाहने त्या भागातून पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे अर्धा ते एक तास वाहने मानपाडा रस्ता, इंदिरा चौक, फडके रस्ता, रामनगर, टिळक रस्ता, केळकर रस्ता भागात अडकून पडली होती. नोकरदारांची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि त्याच वेळेत ही कोंडी झाल्याने प्रवासी रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.

हेही वाचा…मुरबाडमध्ये महायुतीतच पदाधिकाऱ्यांची पळवापळवी, बदलापूर शिवसेना उपशहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

वरिष्ठ पक्षीय नेत्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने पक्षीय कार्यालयापासून दूर अंतरावर किंवा पालिकेच्या, खासगी वाहनतळावर वाहने उभी करून मगच पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अशीच परिस्थिती कल्याणमधील विविध भागात आहे.

हेही वाचा…कल्याणमध्ये रिक्षेच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील कोंडी झाल्याने ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस, सेवकांची दमछाक झाली होती. पक्षीय नेत्यांना वाहने थोडी बाजुला उभी करा, असे सांगणार कोण, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. दिवाळी सणामुळे बाजारपेठा गजबजून जातील. खरेदीसाठी नागरिक अधिक संख्येने बाहेर पडतील. त्याचवेळी निवडणूक बैठकांसाठी नेते, पदाधिकारी आपल्या पक्षीय कार्यालयांमध्ये हजेरी लावणार आहेत. या नेत्यांनी आपली वाहने नागरिकांना त्रास होणार नाहीत अशा पध्दतीने उभी करण्याची नागरिकांची मागणी आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, गुरुदेव हाॅटेल चौक भागातील कोंडीने नागरिक हैराण आहेत.