लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : येथील रेतीबंदर भागात ध्वनीवर्धकावर कर्णकर्कश गाणी लावून गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास उच्चशिक्षित चार तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत होते. त्यांच्या ताब्यात मोटार कार होती. कारवर त्यांचे नियंत्रण नव्हते. त्यामुळे हे तरुण मोठा अपघात करण्याची शक्यता असल्याने या भागातील रहिवाशांनी तातडीने बाजारपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्यांना अटक केली.
प्रथम पवार, तुषार गाढवे, नितीन भोंडविले, आकाश सानप अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. सार्वजनिक शांततेचा भंग करत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…. ठाणे : सिगारेट दिली नाही म्हणून एकावर जीवघेणा हल्ला
पोलिसांनी सांगितले, गुरुवारी पहाटे रेतीबंदर भागातील रहिवासी गाढ झोपेत असताना चार तरुणांचे टोळके एका मोटारमधून रेतीबंदर भागात आले. या भागात तबेले आहेत. पहाटे तीन वाजल्यापासून दूध विक्रेते, चहा, नाष्टा विक्रेत्यांची या भागात वर्दळ असते. ते या भागात आपले ठेले लावून व्यवसाय करतात. तरुणांनी मोटारीमधून उतरुन रस्त्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. परिसरातील रहिवासी जागे झाले. तरुण दारु प्यायले आहेत हे रहिवाशांच्या लक्षात आले. मोटारातील ध्वनीवर्धक यंत्रणेवर मोठ्याने गाणी लावून ते रस्त्यावर नाचगाणी करत होते.
हेही वाचा…. ठाणे महापालिकेच्या प्रसुती गृहात आग
हे तरुण शुध्दीत नसल्याने ते आपल्याला मारहाण करतील या भीतीने विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. या भागातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांना कळविले. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी चारही तरुणांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये हे तरुण उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या तरुणांना अटक केली नसती तर त्यांनी या भागात गोंधळ घालून विक्रेत्यांना मारहाण ही केली असती, असे विक्रेत्यांनी सांगितले.