कल्याण : कल्याण पूर्व जे प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांवर फेरीवाला हटाव पथक प्रमुख भगवान पाटील यांच्यामुळे कारवाई होत नसल्याच्या तक्रारी होत्या. फेरीवाल्यांना न हटविण्यासाठी जे प्रभागातील पथकप्रमुख भगवान पाटील हे फेरीवाल्यांच्या मध्यस्थाकडून पैसे घेत असताना काही दिवसापूर्वी मोबाईल कॅमेऱ्यात रंगेहाथ कैद झाले होते. पाटील यांच्या कृतीमुळे पालिकेची प्रतीमा मलीन झाल्याने आयुक्तांच्या आदेशावरून कल्याण पूर्वेतील जे, ड आणि आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कल्याण पूर्वेत शुक्रवारी फेरीवाला हटाव मोहीम राबवून फेरीवाल्यांचे दोन ट्रक सामान जप्त केले.
यामध्ये गॅस सिलिंडर, हातगाड्या, टपऱ्या, सामान यांचा समावेश आहे. जे प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे, आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकांनी ही फेरीवाला हटाव मोहीम राबवली. गेल्या आठवड्यात पथकप्रमुख भगवान पाटील हे फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी फेरीवाल्यांकडून पैसे स्वीकारत असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले होते याप्रकरणाची दखल घेऊन आयुक्तांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी भगवान पाटील यांना सेवेतून निलंबित केले.
फेरीवाला हटाव पथके ही पैशासाठी फेरीवाल्यांची पाठराखण करतात, असा एक संदेश गेल्याने पालिकेची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून शुक्रवारी कल्याण पूर्व भागात रस्ते, पदपथ अडवून बसणारे, गल्ली बोळातील फेरीवाल्यांवर फेरीवाला हटाव पथकांना आक्रमक कारवाई केली. या कारवाईत फेरीवाल्यांचे दोन ट्रक सामान जप्त केले.
कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा, अरुंद रस्त्यांचा भाग आहे. या रस्त्यावरील फेरीवाल्यांवर पथकप्रमुख पाटील यांच्या नाकर्तेपणामुळे आक्रमक कारवाई होत नव्हती. त्यामुळे अनेक फेरीवाल्यांनी पदपथ, रस्ते अडवून ठेले उभारले होते. आपल्या हक्काच्या जागा निश्चित करून तेथे सकाळ, संंध्याकाळ व्यवसाय केला जात होता. पादचाऱ्यांना या फेरीवाल्यांमुळे त्रास होत होता.
शुक्रवारी तिन्ही प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकांनी एकत्रितपणे कारवाई करून रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवले. ही कारवाई यापुढे नियमित सुरू ठेवली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त तामखेडे यांनी सांगितले.