कल्याण – घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांंपर्यंत पोहचविण्यासाठी, त्यांनी लिहिलेले संविधान आणि लोकशाहीचा विचार अधिकाधिक व्यापक प्रमाणात तळागाळात पोहचण्यासाठी कल्याणमध्ये खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रांसारखी केंद्रे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी कल्याण पूर्वेतील डाॅ. आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे उद्घाटन करताना केली.

कल्याण पूर्व पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरील डाॅ. बाबासाहेब आंंबेडकर ज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे लोकार्पण उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय विकास मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, आयुक्त अभिनव गोयल, डाॅ. आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख नीलेश शिंदे, जिल्हा संघटक प्रशांत काळे, रमाकांत देवळेकर, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपायुक्त संजय जाधव उपस्थित होते.

दूरदृश्यप्रणालीतून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कधी उत्तरपत्रिका लिहिताना काॅपी केली नाही. पण खासदार शिंदे यांनी कल्याणमध्ये उभारलेले डाॅ. आंबेडकर ज्ञान केंद्र इतके माहितीपूर्ण, देखणे आहे की खासदारांनी नकार दिला तरी आम्ही या ज्ञान केंद्राची काॅपी करू. अशी केंद्रे प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

डाॅ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास रत्नागिरीतमधून सुरू झाला. त्यामुळे डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाचे एकाच ठिकाणी समग्र माहिती देणाऱ्या या ज्ञान केंद्राची रत्नागिरीतही तत्परतेने उभारणी केली जाईल. डाॅ. बाबासाहेबांचा विचार, अनमोल ठेवा या केंद्राच्या माध्यमातून कोकण पट्टीत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव येथे अभिवादन दिनानिमित्त दरवर्षी साडे चौदा कोटीची उधळपट्टी केली जात होती. रस्ते, पाणी, किरकोळ सुविधा व्यतिरिक्त तेथे काही नसायचे. हा प्रकार आपण पूर्ण बंद केला. त्याऐवजी डाॅ. बाबासाहेबांचा विचार समाजात पोहचविण्यासाठी समाज विकास मंदिर, अशी ज्ञान केंद्रे खूप महत्वाची आहेत. म्हणून आपण भीमा कोरेगाव येथील विकासासाठी विचार पोहचविणाऱ्या विकास कामांसाठी १०० कोटीचा निधी जाहीर केला आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला संघर्ष करा आणि शिका सल्ला दिला आहे. आपण फक्त संघर्ष करतो. शिक्षणाच्या विचारात आपण मागे पडतो. तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून तालुका, शहर पातळीवर १२५ वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वसतीगृहात पहिल्या टप्प्यात २५ हजार विद्यार्थी प्रवेश घेतील, असे नियोजन आहे, असे सामाजिक न्याय विकास मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनव गोयल, सूत्रसंचालन महेश देशपांडे यांनी केले.