लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पूर्वेतील नेवाळी नाका परिसरातील गाव, पाड्यांवर मोकळ्या माळरानांवर सुरू असलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे बुधवारी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.
नेवाळी नाका, डावलपाडा, व्दारलीपाडा, वसार गाव परिसरातील मोकळ्या जागांवर भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याची कामे सुरू केली आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना समजली होती. त्यांनी या जागांची पाहणी केल्यानंतर त्यांना माफियांनी रस्ते, वहिवाटीचे रस्ते अडवून चाळी बांधणीचे कामे सुरू केली असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा… श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क अभियानात ठाकरेंच्या अपयशावर अधिक टीका
आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त सुधाकर जगताप, स्वाती देशपांडे यांच्या आदेशावरुन साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी जेसीबी, तोडकाम पथकाला घेऊन काल अचानक नेवाळी पाडा परिसरातील बेकायदा चाळी, नवीन जोते, व्यापारी गाळ्यांवर कारवाई सुरू केली. तोडकाम पथक येत असल्याचे समजाच घटनास्थळांवरुन माफिया पळून गेले. गेल्या काही महिन्यांपासून आय प्रभाग साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आक्रमकपणे तोडकाम मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे माफियांमध्ये अस्वस्थता आहे.
हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा येथील सभेजवळ विजेच्या झटक्याने एकाचा मृत्यू
पावसाळ्याच्या तोंडावर चाळी तोडल्याने माफियांचे आर्थिक कंबरडे मोडण्यात आले आहे. चाळीतील एक खोली पाच लाखाला विकून दौलतजादा करण्याचा माफियांचा इरादा होता, असे स्थानिकांनी सांगितले. अशाप्रकारे चाळीतील स्वस्तात घरे घेऊन याभागातील अनेक नागरिकांची फसवणूक झाली आहे. पावसाळ्यात या चाळींमध्ये पाणी शिरते. निकृष्ट कामामुळे भिंती कोसळतात, असे रहिवाशांनी सांगितले.