कल्याण : रामनवमी उत्सवानिमित्त रविवारी संध्याकाळी सकल हिंदु समाजातर्फे कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी बस आगार ते चक्कीनाका दरम्यान रामनवमी उत्सवाची मिरवणूक काढण्यात आली होती. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या प्रतिमा उत्सव प्रेमींकडून गाण्यांच्या तालावर नाचविण्यात येत होत्या.

वर्षातून एकदा येणाऱ्या रामनवमी उत्सवात काही अति उत्साही मंडळींनी उत्सव मिरवणुकीत हे कृत्य केल्याने अनेक नागरिकांनी समाज माध्यमांत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रामनवमी उत्सवात प्रभू रामचंद्र यांची गाणी आणि त्यांचा गजर करण्याऐवजी काही अतिउत्साही मंडळींनी नथुराम गोडसे याचे फलक झळकविले. हे फलक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नथुराम गोडसे याच्या फलकाखाली ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही इधर राज करेगा,’ असे घोष वाक्य लिहिण्यात आले होते.

सकल हिंदु समाजातर्फे आयोजित या रामनवमी उत्सव मिरवणुकीत कल्याणमधील नागरिक, विविध सामाजिक संस्था, हिंदू धर्म संघटनांचे कार्यकर्ते अधिक संख्येने सहभागी झाले होते. डीजेच्या तालावरील गाण्यांवर ठेका धरत मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली होती. तरूण वर्ग अधिक संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाला होता.

रामनवमीचा उत्सव असताना एका कार्यकर्त्याच्या हातात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, नथुराम गोडसे यांची प्रतिमा असलेले फलक होते. प्रभु रामचंद्रांचा जयघोष करत, काही कार्यकर्ते हातात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिम असलेले फलक घेऊन त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. त्यानंतर अचानक एका उत्सव प्रेमीने हातामधील फलक उंचावला. त्यावर नथुराम गोडसे यांची प्रतिमा होती. या प्रतिमेखाली जो हिंदुंंच्या हिताचा विचार करील तोच येथे राज्य करील, असे घोष वाक्य लिहिले होते.

नथुराम गोडसे यांचे रामनवमी उत्सवात उदात्तीकरण करून, गोडवे गाऊन आयोजकांनी काय साध्य केले. गोडसे यांची प्रतिमा रामनवमी उत्सवात घेऊन कार्यकर्ते सहभागी होत आहेत हे पोलीस किंवा आयोजकांना कसे दिसले नाही, असे प्रश्न आता नागरिकांकडून समाज माध्यमांत, विविध स्तरांवर उपस्थित करत आहेत.

कल्याण पूर्वेतील सकल हिंदु समाजाच्या मिरवणुकीत नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्याचा झालेला प्रकार, ज्या कार्यकर्त्याच्या हातात नथुराम गोडसे यांचा फलक होता, त्यांच्यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.