डोंबिवली : कल्याण पश्चिमेत आजमेरा हाईट्स संकुलात परप्रांतीयाने मराठी कुटुंबांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, कल्याण पूर्वेत शनिवारी रात्री एका परप्रांतीय कुटुंबाने एक मराठी कुटुंबातील तीन जणांना शिवीगाळ करत मारहाण केली. विनयभंग प्रकरणावरून जाब विचारल्याने परप्रांतीय कुटुंबियांनी मारहाण केल्याची तक्रार मराठी कुटुंबाने मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत केली आहे. परप्रांतीय कुटुंबाने आपणास मराठी कुटुंबाने मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले.
पीडित मुलीच्या आईच्या मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, इमारतीमधील मारहाण करणारे कुटुंब आणि आम्ही शेजारी राहतो. काही वर्षापासून एकमेकांना ओळखतो. शनिवारी रात्री दहा वाजता पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मैत्रिणी इमारतीच्या मोकळ्या जागेत खेळत होत्या. खेळत असताना पीडित मुलगी परप्रांतीय कुटुंबियांच्या घरासमोर आली. त्यावेळी घरातील व्यक्तिने या मुलीला स्वताच्या घरात ओढून घेतले आणि तिचा विनयभंग केला. परप्रांतिय व्यक्तिच्या पत्नीने मुलीला सोडून द्या, असे सांगितल्याने मुलीची सुटका झाली. त्यानंतर घडल्या प्रकाराने घाबरलेली मुलगी रडत घरी आली. मुलगी खेळत असताना रडत का आली म्हणून पीडितेच्या आई, वडिलांनी तिला कारण विचारले तर, तिने इमारतीमधील व्यक्तिने केलेला प्रकार घरात सांगितला.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनीच स्विकारावे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची इच्छा
तात्काळ पीडित मुलीचे वडील आणि आई संबंधिताला जाब विचारण्यासाठी गेले. तेव्हा संबंधिताने पीडित मुलीच्या वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच संबंधिताच्या पत्नीने पीडितेची आई आणि आजीला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेची माहिती तात्काळ गस्तीवरील पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटना सांगण्यात आली. पीडितेची मुलगी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात आली. तिने पीडित मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्ति आणि त्याच्या पत्नी विरुध्द शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
एकाच इमारतीमधील दोन शेजाऱ्यांमधील हा वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात पीडितीने आपल्यासह कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार केली आहे. तर गुन्हा दाखल व्यक्तिने आपणास पीडित कुटुंबाने मारहाण केली असल्याचे सांगत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. विजय कादबाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे.