कल्याण : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार केली. पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत.
जमीन विषयीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गेल्या दोन महिन्यातील दुसरा गुन्हा आहे. या गुन्ह्यांमुळे महेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर महेश हे २५ दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते. आताच ते सुस्थितीत होऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान (५८) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा : देशात तपासयंत्रणा हाताशी धरून खडणीचे रॅकेट, राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार सदृध्दीन खान यांनी २००९ मध्ये इक्बाल खान यांच्या ओळखीने मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावातील श्यामसुंदर लक्ष्मण पाटील यांची २७ एकर जमीन महसूल विभागाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून, खरेदी विक्रीची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून जमीन खरेदी केली. सात बारा उतारा खान यांच्या नावे झाला. तक्रारदार खान यांनी २०१९ मध्ये अंबरनाथ भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणी करून घेतली. त्यावेळी मलंगगवाडीतील शेवंताबाई मुका फुलोरे आणि इतरांनी त्यास विरोध केला. शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी पूर्ण केली.
ऑगस्ट २०२३ मध्ये जमीन मालक खान यांच्या जमिनीवर ‘ही जमीन महेशशेठ दशरथ गायकवाड आणि इतर आरोपींच्या कब्जे वहिवाटीची आहे. या जमिनीत कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा फलक लावला होता. मालकीच्या जमिनीवरील बेकायदा फलक खान यांनी काढण्याचा प्रयत्न केला त्याला आरोपींनी विरोध केला. आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या, अशी मागणी आरोपींनी खान यांच्याकडे केली.
सप्टेंबर २०२३ मध्ये खान यांनी हिललाईन पोलिसांच्या सहकार्याने कुशीवली येथील जागेत आरोपींनी लावलेला कब्जे वहिवाटीचा फलक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाचही आरोपींनी त्यास विरोध केला. यावेळी महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी वाहनांमधून आले. त्यांनी खान यांच्या जमिनीवर लावलेला कब्जे हक्काचा फलक काढण्यास विरोध केला. आम्ही जी पाच कोटीची मागणी केली आहे, ती पूर्ण करा, अशी मागणी खान यांच्याकडे केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने महेश गायकवाड साथीदारांसह तेथून निघून गेले.
हेही वाचा : केडीएमटीच्या बसमधून ज्येष्ठांना मोफत प्रवास; महिलांना ५० टक्के सवलत
मालकी हक्काची जमीन असुनही त्यावर महेश गायकवाड यांच्यासह इतर आरोपी कब्जे हक्क सांगत होते. त्यामुळे खान त्रस्त होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये खान कुशीवली येथील जमीन पाहणीसाठी आले त्यावेळी तेथील त्यांच्या मालकी हक्काच्या सर्वे क्रमांक ८२-ब या २७ एकर जमिनीवर ‘सदर जमीन नगरसेवक महेशशेठ गायकवाड, फुलोरे यांच्या कब्जे वहिवाटीची आहे. सदर जागेत कोणीही अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा ठळक अक्षरातील फलक लावला होता. महेश गायकवाड, फुलोरे कुटुंबिय आपल्या मालकीच्या जागेत हक्क दाखवून बेकायदा आपल्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी पाच कोटी खंडणीची मागणी करत असल्याने जमीन मालक सदृध्दीन खान यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली.