कल्याण – कल्याण पूर्वेतील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवली-ढोकळी, मलंग गड रस्त्यांच्या काही भागात बेकायदा इमारतींचे मल, सांडपाणी भुयारी गटारात सोडण्याची व्यवस्था नाही. हे पाणी दररोज रस्त्यांवर वाहून येते. या दुर्गंधीयुक्त रस्त्यांवरून चालणे, पाण्यातून वाहने नेणे वाहन चालकांना अवघड होत आहे. परिसरातील रहिवासी या तुंबणाऱ्या पाण्याने हैराण आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्वेतील आडिवली-ढोकळी भागात ५०० हून अधिक बेकायदा इमारती मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत भूमाफियांनी उभारल्या आहेत. या इमारती बांधताना बांधकामाचे कोणतेही निकष पाळण्यात आले नाहीत. मागील चार ते पाच वर्षांत आडिवली, ढोकळीत उभारण्यात आलेल्या एकाही इमारतीला आणि नवीन उभारण्यात येत असलेल्या इमारतींलगत सांडपाणी, मलपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही. सरकारी, वन, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर या इमारती उभारण्यात आल्या आहेत. नवीन बेकायदा इमारती उभारणीसाठी जागोजागी भूखंडांच्या ठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत. या भागातील राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने हे बांधकामाचे उद्योग सुरू आहेत. स्थानिक रहिवासी याविषयी पालिकेत तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

हेही वाचा – ‘महारेरा’च्या बनावट नोंदणीचे पेव, मुंबई महानगर प्रदेशातील ग्राहकांची फसवणूक सुरूच

रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्याची रात्रीच्या वेळेत खूप दुर्गंधी येते. डास या पाण्यावर तयार होतात. रिक्षा चालकांना पाणी भरलेल्या रस्त्यांवरून रिक्षा नेताना कसरत करावी लागते. अनेक वेळा इंजिनमध्ये पाणी जाऊन रिक्षा बंद पडत आहेत. पाण्याखालील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते पाण्यामुळे दिसत नसल्याने रिक्षा खड्ड्यात आपटत आहे. त्याचा फटका रिक्षा चालकांना बसत असल्याच्या तक्रारी आहेत.

स्वच्छ सुंदर कल्याण डोंबिवली पालिका म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे मागील तीन वर्षांपासून अभियान राबविण्यात येत आहे. पालिकेच्या एका भागात खराब रस्ते, दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने आणि रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. याची जाणीव ठेऊन पालिकेने या भागातील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घ्यावी. या भागातील बेकायदा बांधकामे आणि घाणीचा पसरलेला पसारा कमी करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून या बेकायदा बांधकामांना कारवाईच्या नोटिसा देण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली जात नाही, अशा तक्रारी आहेत. डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारतींचा घोटाळा उघडकीला आला आहे. या बेकायदा इमारत प्रकरणाची ईडी, गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. अनेक भूमाफिया विशेष तपास पथकाच्या चौकशीत पोलीस कोठडी, तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. तरीही कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांची उभारणी थांबत नसल्याचे पाहून नागरिक, सरळमार्गाने काम करणारे विकासक, वास्तुविशारद हैराण आहेत.

हेही वाचा – ठाणे : उपवन तलावात महिलेचा मृतदेह आढळला

उन्हाळ्यात आडिवली-ढोकळी, मलंग गड भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचते. पावसाळ्यात या रस्त्यांवरून जायचे कसे, असा प्रश्न या भागातील रहिवासी करत आहेत.

“पालिका हद्दीत एमएमआरडीएकडून २१३ कोटींची काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत. कल्याण पूर्व भागातील रस्तेही या कामांमध्ये आहेत. निधीच्या उपलब्धतेप्रमाणे उर्वरित रस्ते हाती घेण्यात येणार आहेत.” असे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan east sewage from illegal buildings on roads ssb