कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात सोमवारी संध्याकाळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची चार अज्ञात इसमांनी तोडफोड केली. यावेळी केबल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
काही दिवसापूर्वी उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या वादानंतर दोन्ही गटातील वाद आणखी उफाळून आला असून सोमवारी सायंकाळी आमदार गायकवाड यांच्या भावाच्या केबल कार्यालयात अनोळखी इसमांनी गोंधळ घालून तोडफोड केली.
हेही वाचा…ठाण्यातील दहा हजारहून अधिक महिलांना मिळणार पालिका योजनेचा लाभ; धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना
पोलिसांनी सांगितले, तिसगाव भागात आमदार गायकवाड यांचे भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे एका गाळ्यामध्ये जय मल्हार, श्री साई केबल नावाने कार्यालय आहे. कार्यालयात केबल नियंत्रण करणारे कर्मचारी कार्यरत असतात. सोमवारी संध्याकाळी दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून अभिमन्यू गायकवाड यांच्या केबल कार्यालया समोर आले. ते बाहेरून कार्यालयाची टेहळणी करत होते. कार्यालया समोर कर्मचाऱ्याचे वाहन उभे होते. अनोळखी इसम बाहेरून कसली पाहणी करतात हे पाहण्यासाठी आणि त्यांना विचारण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी बाहेर आला.
दोन इसमांना कर्मचारी विचारणा करत असताना दुचाकीवरील तरुणांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली. आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेऊन केबल कार्यालयात जाऊन तेथील तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी घाबरले. कार्यालया बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाण, तोडफोडीचा प्रकार कैद झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणातून चारही हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी सांगितले.
हेही वाचा…ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१७ घरांची विक्री
आमदार गणपत गायकवाड यांनी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार घटनेपासून दोन्ही गायकवाड यांच्या कार्यालय, घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशत पसरविण्यासाठी हा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.