कल्याण : येथील पूर्व भागात विजयनगरमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून भिवंडी जवळील एका तरूणाला आणि त्यांच्या साथीदाराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन इसमांनी केली. एका तरूणावर धारदार कोयत्याने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांपैकी एक जण सराईत गुन्हेगार आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की भिवंडी येथील तुळशी गावातील रहिवासी तेजस बराडे आणि त्यांचा साथीदार धीरज जावळे शनिवारी रात्री आपल्या दुचाकीवरून कल्याण पूर्वेतील विजयनगर भागातून दुचाकीवरून जात होते. त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रस्ता माहिती नसल्याने त्यांनी त्या रस्त्याने दुचाकीवरून चाललेल्या तीन जणांना पुढे रस्ता आहे का, अशी विचारणा केली.
हेही वाचा : कल्याण डोंबिवलीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना, ग्रामीण भागाला योजनेचा लाभ नाही
आपल्याला तरूणांनी अशी विचारणा का केली, याचा राग येऊन दुचाकीवरील तीन तरूणांनी आपली दुचाकी थांबवून रस्त्याची विचारणा करणाऱ्या तरूणाची दुचाकी थांबवली. गुन्हा दाखल तिन्ही इसमांनी संगनमत करून तक्रारदार तेजस बराडे आणि त्यांचा साथीदार धिरज जावळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारेकऱ्यांपैकी दोन जणांनी जवळील कोयत्याने धिरजच्या डोक्यावर तीन वेळा वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. धीरजवर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : डोंबिवलीतील बेकायदा ५८ पैकी २५ इमारती महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर
तेजस बराडे यांनी मारहाण प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी एक जण भालगाव येथील रहिवासी आहे. एक सराईत गुन्हेगार तर एक अनोळखी इसम आहे. पोलिसांनी भालगावातील इसमाला ताब्यात घेतले आहे. एका मारेकऱ्यावर विठ्ठलवाडी, बाजारपेठ, बदलापूर पोलीस ठाण्यात गु्न्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. भालेराव याप्रकरणाचा तपास करत आहेत.