कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात शनी मंदिराजवळील चंद्रकिरण सोसायटीत एका घरात तिसऱ्या माळ्यावर लोखंडी जाळी लावलेल्या खिडकीत खेळताना सात वर्षाचे बालक जाळीत पडले. तकलादू झालेली लोखंडी जाळी बालकासह तुटली. त्या बरोबर बालक जाळीतून बाहेर पडून इमारतीबाहेरील अधांतरी सज्ज्यावर अडकले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शिडीच्या वाहनाने (लॅडर) बाळाला सुखरूप वाचविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालकाला मिळालेल्या या जीवदानाबद्दल कुटुबीयांसह परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. वंश लांडगे (७) असे बालकाचे नाव आहे. लोखंडी जाळीचे भिंतीला असलेले काही खिळे निघून बालक त्या जाळीसह सज्ज्यावर अडकला होता. फक्त जाळीचे दोन खिळे भिंतीत अडकून राहिले होते. त्यामुळे बालक लोखंडी जाळीसह अंधातरी सज्ज्यावर अडकून राहिला होता. ते दोन खिळे इतर खिळ्यांसह निघाले असते तर बालकासह लोखंडी जाळी जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा : ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री फेरफटका मारण्यासाठी मद्य पिऊन बसगाडीची केली चोरी, पण अपघात झाला अन्…

वंश लांडगे आपल्या आई, वडिलांसोबत राहतो. गुरुवारी संध्याकाळी वंशला घरात एकटाच ठेऊन त्याची आई बाजारात गेली होती. नेहमीप्रमाणे वंश घरात राहील असा विचार आईने केला होता. घरात एकटाच असताना वंश राहत्या घराच्या खिडकीत गेला. खिडकीला बाहेरून लोखंडी जाळी (ग्रील) होती. वंश खिडकीतून उतरून लोखंडी जाळीत उतरला. तेथे खेळत असताना अचानक लोखंडी जाळीचे दोन खिळे वगळता जाळीचे सर्व खिळे निघून जाळी बालकासह कोसळली. परंतु, खिडकीच्या खाली सज्जा असल्याने लोखंडी जाळीसह बालक त्या सज्ज्यावर अडकला. बालकाने त्या जाळीला धरून सज्जावर तोल सांभाळून उभे राहण्याचे धाडस केले. जाळीचे दोन खिळे भिंतीत राहिल्याने जाळीचा काही भाग अंधातरी तर काही भाग लोंबकळत होता.

शेजाऱ्यांना मोठ्या आवाज झाल्याचे जाणवले. ते बाहेर आले. त्यावेळी लांडगे यांच्या घराची लोखंडी जाळी तुटून त्यांचा मुलगा सज्ज्यावर अडकला असल्याचे दिसले. रहिवाशांनी वंशला आहे त्या ठिकाणीच उभे राहण्यासाठी धीर दिला. कल्याण पूर्व ड प्रभाग अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच, उपस्थानक अधिकारी संजय म्हस्के, जवान ॲलन डिसोझा आणि पथक तातडीने घटनास्थळी आले.

हेही वाचा : जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थांचा शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध

मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपस्थानक अधिकारी म्हस्के यांनी काही जवान इमारतीच्या वरील भागात बालकाला दोरात सुरक्षितपणे अडकविण्यासाठी पाठविले. इमारतीच्या तळाला अग्निशमन लॅडर वाहन उभे करून शिडीव्दारे जवान डिसोझा बालक अडकलेल्या सज्ज्याच्या दिशेने गेले. बाळाला सुरक्षितपणे दोरात अडकवून सुखरूप जवान डिसोझा यांनी आपल्या पाठीवरून जमिनीवर आणले. त्याला थोडे खरचटले आहे. त्याला तातडीने आई, वडिलांनी रुग्णालयात नेले. अग्निशमन जवानांनी बाळाला दिलेल्या जीवदानाबद्दल पालकांसह रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan east vitthalwadi child stuck on the chhajja of a building rescued by fire brigade css