कल्याण : ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावानाने मद्याच्या धुंदीत आपल्या लहान भावाचा खून केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील रोहिदासवाडा भागातील सलीम रामपुरी चाळीत घडली आहे. याप्रकरणी मृत मुलाची आई अकलिमा खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोठ्या मुलाच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोठ्या मुलाला अटक केली आहे. बुधवारी रात्री खान कुटुंबीयांच्या घरात हा प्रकार घडला.
सलीम शमीम खान (३२) असे अटक करण्यात आलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. नईम शमीम खान (२७) असे मृत भावाचे नाव आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे यांनी सांगितले, सलीम आणि नईम हे सख्खे भाऊ आहेत. ते रोहिदास वाडा हनुमान मंदिर भागात राहतात. बुधवारी रात्री साडे नऊ वाजता मोठा भाऊ सलीम खान हे मद्य पिऊन घरी आले. त्यांनी मद्याच्या धुंदीत लहान भाऊ सलीम यांना तु माझ्या खिशातील ५०० रूपये का काढून घेतले, अशी विचारणा केली. या विषयावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला.
हे ही वाचा… ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार लाडक्या लेकींना मिळाला लाभ, लेक लाडकी योजनेचे काम प्रगतीपथावर
या वादात आई अकलिमाने मध्यस्थी करून ‘तुझे ५०० रूपये मी देते, पण तू नईम सोबत भांडण करू नकोस’, असे सांगितले. तरीही सलीम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो सतत नईम याच्याशी वाद उकरून काढत होता. दोघांमधील वाद शेवटी विकोपाला गेला. रागाच्या भरात सलीमने घरातील सुरा घेतला आणि सुऱ्याचे वार नईमवर केले. वर्मी घाव बसल्याने नईम खान अत्यवस्थ झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर सलीम घरातून पळून गेला. बाजारपेठ पोलिसांनी तातडीने त्याचा तपास सुरू करून त्याला अटक केली.सलीम खानवर आई अकलिमा खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.