कल्याण : मुलाला वन विभागाच्या कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून चार भामट्यांनी कल्याण तालुक्यातील मानिवली गावातील एका शेतकऱ्याकडून टप्प्याने पाच लाख २५ हजार रूपये वसूल केले. या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
आपल्याला चार भामट्यांनी दिलेले नियुक्तीचे पत्र बोगस असल्याची खात्री पटल्यावर मानिवली येथील शेतकरी चंद्रकांत चऱ्या माळी (५४) या शेतकऱ्याने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी कृष्णा शिंदे, प्रवीण अनंता पवार (रा. बदलापूर), ऋतुजा चौधरी (रा. ठाणे), हिरामण उर्फ बाळा भवर (रा. न्यू बौध्द विहार सोसायटी, लोकमान्य नगर, ठाणे) या भामट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : बाजारातही रामनामाचा जयघोष, टी-शर्ट, साड्या, मोबाईल कव्हर, शाल अशा विविध साहित्यांवर रामाचे छायाचित्र
पोलिसांनी सांगितले, मानिवलीचे रहिवासी चंद्रकांत माळी यांना दोन मुले आहेत. मुलांना नोकरी मिळविण्याच्या ते प्रयत्नात होते. मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील कृष्णा शिंदे यांनी चंद्रकांत यांना आपल्या ओळखीचे बदलापूर येथील प्रवीण पवार आणि त्यांचे सहकारी सरकारी नोकरी मिळून देतात. त्यांची वरिष्ठ पातळीवर ओळख आहे असे सांगितले.
चंद्रकांत यांनी कृष्णा शिंदे यांच्या सूचनेवरून प्रवीण पवार यांची ठाणे येथे भेट घेतली. पवार यांनी तुमच्या मुलाला आपण नक्की सरकारी नोकरी मिळून देतो. तुमच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्रे आपणास द्या असे सांगून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. आरोपींनी नोकरीच्या कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाच लाख रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. सरकारी नोकरी मुलाला मिळणार असल्याने पाच लाख रुपये देण्याची तयारी तक्रारदाराने दर्शवली. आरोपींनी वरिष्ठांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून चंद्रकांत यांच्याकडून टप्प्याने पाच लाख २५ हजार रूपये वसूल केले.
हेही वाचा : डोंबिवलीतील अस्वस्थ नेत्यांचा भाजपला रामराम, राजाश्रयासाठी शिंदे अधिक सोयीचे
ठाण्याच्या विविध भागात बोलावून हे पैसे आरोपींनी तक्रारदाराकडून स्वीकारले. संपूर्ण पैसे स्वीकारल्यानंतर आरोपींनी चंद्रकांत माळी यांना भिवंडी वन विभागात मुलाला नोकरी लागल्याचे नियुक्ती पत्र दिले. हे पत्र मुलगा कामावर जाईपर्यंत गुप्त ठेवा. ते कोणाला कळले तर आपली माहिती उघड होईल, आणि मुलाच्या नोकरीत अडथळा येईल, असे भामट्यांनी तक्रारदाराला सांगितले.
हेही वाचा : Badlapur Fire: बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग लागल्याने एका कामगाराचा मृत्यू, चार जण जखमी
या नियुक्ती पत्राविषयी संशय आल्याने चंद्रकांत माळी यांनी आरोपींना पूर्व सूचना न देता गुपचूप भिवंडी येथील वन विभागाच्या कार्यालयात रिक्त जागा भरली जाणार आहे का याची चौकशी केली आणि जवळील नियुक्ती पत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविले. ते पत्र बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदाराने भामट्यांना भिवंडी येथील वन विभागाच्या कार्यालयात एकत्रित जाण्याची मागणी केली. त्याला भामट्यांनी नकार दिला. आरोपी तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याच्या संपर्काला प्रतिसाद देत नव्हते. आपली फसवणूक आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाल्यावर चंद्रकांत माळी यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.