कल्याण – कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल भागातील झुलेलाल चौकातील रिव्हर डेल विस्टा इमारतीच्या चौदाव्या आणि पंधराव्या माळ्यावरील सदनिकांना मंगळवारी रात्री भीषण आग लागली. रात्रीच्या वेळेत वाऱ्याचा वेग असल्याने आणि इमारतीच्या शेवटच्या माळ्याला ही आग लागल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन अग्निशमन वाहनांच्या साहाय्याने तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. वाढती आग विचारात घेऊन घटनास्थळी अग्निशमन दलाची इतर वाहनेही घटनास्थळी पाचारण करण्यात आली आहेत.
आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन विभागाचे जवान आग विझविण्याचे काम करत आहे. या इमारतीत रहिवास असला तरी आग लागलेल्या भागातील रहिवासी सुरक्षित ठिकाणी कोठे आहेत हे समजलेले नाही, असे अग्निशमन प्रमुख नामदेव चौधरी यांनी सांगितले. आगीचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही असे ते म्हणाले. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता जवान व्यक्त करतात.
गेल्या काही महिन्यापूर्वी कल्याण मधील खडकपाडा येथील व्हर्टेक्स साॅलिटेअर गृहसंकुलाच्या पंधराव्या माळ्याला आग लागली होती. त्यावेळी पालिकेची टीटीएल हे उंच फवाऱ्याने आगीवर नियंत्रण मिळविणारे वाहन नादुरुस्त होते. त्यामुळे ठाणे येथून अत्याधुनिक यंत्रणा मागवून पालिकेला आगीवर नियंत्रण मिळवावे लागले होते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या ताब्यातील टीटीएल हे अग्निशमन विभागाचे वाहन देखभाल दुरुस्तीसाठी खर्चिक आहे. प्रशासनाकडून या वाहनाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आणि खर्चासाठी हात आखडता घेतला जात असल्याची चर्चा आहे.
कल्याण डोंबिवली शहरांमधील उंच इमारती विचारात घेऊन पालिकेने आपल्या ताफ्यात पाण्याचा उंच मारा करणाऱ्या अद्ययावत दोन अग्निशमन वाहने ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत.