कल्याण – केळीच्या पानांच्या गठ्ठ्यांच्या विक्रीवरून दोन फूल विक्री बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये रविवारी सकाळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात वाद झाला. या वादातून एका विक्रेत्याने दुसऱ्या विक्रेत्यावर धारदार कैचीने हल्ला करून त्याचा खून केला. यावेळी विक्रेत्याने मयताची पत्नी, मुलगा चमनलाल यांना वाचविण्यासाठी पुढे आले तर मुलावर वार करून गंभीर जखमी केले तर महिलेला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली.
बाजारपेठ पोलीस ठाण्यात या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. चमनलाल नंदलाल कारला (५५) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. चिराग राजकुमार सोनी (२१) असे खून करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. चिरागला कल्याण पूर्व चक्कीनाका भागातून पळून जात असताना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेली माहिती, अशी की चिराग सोनी (२१) आणि चमनलाल कारला (५५) हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फूल बाजारात केळीची पाने विक्रीचा व्यवसाय करतात. दोघेही समव्यवसायिक आहेत. चिराग आणि चमनलाल यांनी एकत्रितपणे जळगाव येथून केळीच्या पानांचे गठ्ठे मागविले होते. या गठ्ठ्यांमध्ये चार पानांचे गठ्ठे हे चमनलाल कारला यांनी मागविले होते. एक केळीच्या पानांचा गठ्ठा हा चिराग सोनी यांनी मागविला होता. जळगाव येथून केळीच्या पानांचे गठ्ठे आल्यानंतर ठरल्याप्रमाणे एक गठ्ठा, चार गठ्ठे अशी विभागणी करून दोन्ही व्यापारी या पानांची विक्री करणार होते.
परंतु, मयत इसम चमनलाल कारला यांनी चिराग सोनी यांना त्यांचा केळी पानांचा एक गठ्ठा न देता पाचही गठ्ठे स्वतानेच बाजार समितीत विक्रीसाठी आणले. चिराग सोनी यांनी चमनलाल यांच्याकडे आपला एक केळीचा गठ्ठा देण्याची मागणी केली. त्यावेळी तुला काय करायचे तर मी तुला गठ्ठा देणार नाही, अशी भूमिका चमनलाल यांनी घेतली.
या विषयावरून चमनलाल आणि चिराग यांच्यात बाजार समिती परिसरात रविवारी सकाळी जोरादार वादावादी झाली. या वादातून संतप्त झालेल्या चिराग यांनी जवळील कैचीने चमनलाल यांच्या पोटावर धारदार कैचीने वार केले. या हल्ल्यात चमनलाल जागीच ठार झाले. यावेळी चमनलाल यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी नितू कारला, मुलगा कार्तिक (२२ ) पुढे आले तर चिराग सोनीने त्यांच्यावरही कैचीने हल्ला केला. त्याला जखमी केले. चमनलाल यांच्या पत्नीला चिरागने मारहाण करून शिवीगाळ केली. खून केल्यानंतर चिराग कल्याण पूर्व चक्कीनाका भागातून पळून जात असताना बाजारपेठ पोलिसांनी त्याला पकडले.
उपायुक्त झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक रमेश गाडवे, ज्ञानेश्वर गोरे, निसार तडवी, हवालदार विशाल राठोड, अक्षय गिरी यांनी चिरागला ताब्यात घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले याप्रकरणाचा तपास करत आहेत.