ठाणे : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरणाऱ्या फुलबाजारात दिवाळीच्या मुहूर्तावर मागील दोन दिवसात फुलांची उत्तम दराने विक्री होत आहे. मागील दोन दिवसात कल्याण कृषी उत्पन्न बाजारात फुलांची आवक देखील मोठी झाली आहे. शुक्रवारी फुलबाजारात सुमारे १८० गाडयांची आवक झाली आहे. तर मोठ्या झेंडूच्या फुलांची ८० ते १०० रुपये किलोने तर इतर फुलांची ९० ते १३० रुपये दराने विक्री होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह आहे. तसेच लक्ष्मी पूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या या दरात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांकडून सध्या मोठ्या प्रमाणात आपल्या घराची तसेच व्यावसायिक आस्थापनांची सजावट केली जाते. गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडूनही प्लॅस्टिकच्या सजावटीहून फुलांच्या सजावटीला अधिक प्राधान्य देत आहे. यामुळे नागरिकनांकडूनही फुलांचीही अधिक खरेदी केली जाते.याच पार्श्वभूमीवर कल्याण फुलबाजारात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी केली जात आहे. कल्याण फुलबाजारात सांगली, सातारा, डहाणू, पालघर याठिकाणाहून फुलांची मोठया प्रमाणात आवक होत असते. यामध्ये पिवळा, नारंगी, पांढरा झेंडू तसेच गुलाब, बिजली, मोगरा, चाफा यांसारख्या फुलांची देखील मोठी आवक होत असते. संपूर्ण जिल्ह्यातील फुलांची ही सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असल्याने या ठिकाणी दिवाळी, दसरा, गणेशोत्सव तसेच सणोत्सवाच्या काळात फुलांच्या विक्रीतून काही लाख रुपयांची उलाढाल होत असते. जिल्ह्यातील किरकोळ व्यापाऱ्यांकडून तसेच नागरिकनांकडूनही थेट या ठिकाणाहून खरेदी केली जाते. यामुळे या बाजारात बाराही महिने खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते. यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठया प्रमाणात फुलांची खरेदी केली जात आहे.
हेही वाचा… ऐन दिवाळीत बदलापुर, अंबरनाथमध्ये पाण्याचा ठणठणाट
सध्या कल्याण फुलबाजारात मोठया आकाराच्या झेंडूच्या फुलांची ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत आहे. मध्यम आकाराच्या झेंडूच्या फुलांची ४० ते ५० रुपये किलोने, बिजली ६० ते ७० रुपये या दराने विक्री होत आहे. याच पद्धतीने गुलाब, चाफा, शेवंती फुलांची विक्री होत आहे. अशी माहिती फुलविक्रेते भाऊ नरोदे यांनी दिली आहे.