कल्याण : कल्याण लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तगडा उमेदवार मिळत नाही, अशी चर्चा सुरू असतानाच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढवावी म्हणून त्यांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. लवकरच भोईर समर्थकांचा एक गट मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सुभाष भोईर यांच्या नावाचा कल्याण लोकसभेसाठी प्राधान्याने विचार करा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचे दावेदार मानले जातात. शिवसेना फुटीनंतर उघडपणे शिंदे पिता-पुत्रांना उघडपणे शह देण्याची ही एकमेव संधी असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार शिंदे यांना घाम फोडेल असा उमेदवार देण्याची आखणी सुरू केली आहे.
हेही वाचा : घोडबंदर मार्गावरील महत्त्वाचे छेद रस्ते बंद, मुख्य मार्गावरील कोंडीमध्ये काही प्रमाणात दिलासा
कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर हे आगरी समाजातील उमेदवारच खासदार शिंदे यांना घाम फोडू शकतात, अशी चर्चा आहे. आमदार पाटील यांनी मनसेच्या महायुती बरोबरच्या गठबंधनामुळे नांगी टाकली आहे. त्यामुळे अनेक दिवस गायब असलेले सुभाष भोईर आता लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली.
भोईर हे मुळचे दिवा गावातील रहिवासी आहेत. मुंब्रा प्रभागांचे नगरसेवक म्हणून त्यांनी ठाणे पालिकेत २५ वर्ष नेतृत्व केले आहे. याशिवाय आगरी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण ग्रामीण ते अंबरनाथ पट्ट्यात माजी आमदार सुभाष भोईर यांची विकास कामे, नातेसंबधातून स्नेहसंबंध आहेत. कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, डोंबिवली, मलंगगड, अंबरनाथ, उल्हासनगर पट्ट्यात माजी आमदार भोईर यांनी विकासाची कामे केली आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा मतदारसंघात माजी आमदार भोईर यांचा दांडगा संपर्क आहे. या सर्व संधीचा लाभ घेऊन सुभाष भोईर यांना कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे सुभाष भोईर यांचे समर्थक अभिजीत सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेकडून दोन लाखांचा अपहार
बैठका सुरू
सुभाष भोईर यांनी त्यांच्या शीळ येथील घरी ठाकरे समर्थक शिवसैनिकांच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावेत का यासाठी गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांमध्ये समर्थक शिवसैनिकांनी भोईर यांनी निवडणूक लढवावी यावर शिवसेना, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे, असे समर्थक कार्यकर्ते सावंत यांनी सांगितले. कल्याण लोकसभेसाठी केदार दिघे यांचे नाव पुढे येत असले तरी त्यांचे या भागात कर्तृत्व काय आहे, असे प्रश्न करून त्यांच्या नावाविषयी स्थानिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : ठाणेकरांना तुर्तास जलदिलासा, सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय नाही
सुभाष भोईर कल्याण ग्रामीणचे यापूर्वी आमदार होते. या भागात त्यांनी विकासाची कामे केली आहेत. त्यांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची उमेदवारी भोईर यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसैनिक भेट घेणार आहेत.
अभिजीत सावंत, ठाकरे समर्थक शिवसैनिक, डोंबिवली.