कल्याण – प्रवाशांकडून नेहमीच वाढीव भाडे घ्यायचे. कमी भाडे स्वीकारून प्रवासी सेवा द्यायची नाही, अशा इराद्याने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात काही रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करतात. यामध्ये प्रवाशांची लूट करतात. रविवारी एका रिक्षाचालकाने प्रवाशाकडून कमी भाडे आकारून त्याला इच्छिच स्थळी पोहोचविले. त्याचा राग येऊन इतर चार रिक्षाचालकांनी कमी भाड्यात प्रवासी सेवा देणाऱ्या एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात रिक्षाचालकांची दादागिरी वाढत चालली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकाऱ्यांना रिक्षाचालक दाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात अशफाक शेख हा रिक्षाच्या माध्यमातून प्रवासी सेवा देतो. रविवारी एका प्रवाशाला त्याने इच्छित स्थळी नेण्यासाठी रास्त भाडे सांगितले. ते प्रवाशाला मान्य झाल्यावर अशफाकने त्याला इच्छित स्थळी नेण्यासाठी रिक्षा सुरू केली. त्यावेळी अरमान शेख, अरबाज शेख, रमेश गुप्ता, अफलज खान या रिक्षा चालकांनी अशफाकला ‘तू कमी भाडे आकारून प्रवासी सेवा का देतो. यामध्ये आमचे नुकसान होते. प्रवाशांना कमी भाड्यात जाण्याची सवय लागते.’ असे बोलून अशफाकबरोबर भांडण उकरून काढले. चौघांनी मिळून अशफाकला बेदम मारहाण केली.
हेही वाचा – कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेला वालधुनी येथे विरोध, बुद्धभूमी फाउंडेशनची ३१ गुंठे जमीन बाधित
अशफाक शेख याने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या महिन्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी कल्याण पश्चिमेतील काही बेशिस्त रिक्षाचालकांना कारवाईच्या नोटिसा पाठवून त्यांना दंड ठोठावला आहे. रेल्वे स्थानक भागात परिवहन विभागाने अचानक रिक्षा तपासणी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवासी सेवा देणारे बहुतांशी रिक्षाचालक मुंबईतील भायखळा, मस्जिद बंदर, मुंब्रा भागातून येऊन कल्याण रेल्वे स्थानक भागात येऊन प्रवासी सेवा देत आहेत. रिक्षा वाहनतळावर उभे न राहता वाढीव भाडे मिळेल अशा ठिकाणी आडबाजूला रिक्षा उभी करून हे चालक प्रवासी सेवा देतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.