कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गाव हद्दीत गुटखा उत्पादनाचा कारखाना आढळून आला. या कारखान्यातील गुटख्याची परिसरात अवैध विक्री करणाऱ्या तीन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा टाकून अटक केली. त्यांच्या ताब्यातून साठा केलेला सात लाखाचा गुटखा आणि गुटखा निर्मितीसाठी लागणारे १७ लाखाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. विराज आलेमकर, मोहम्द रहमान, मोहम्मद खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोन जण फरार आहेत. कुशीवली गाव हद्दीत गुटख्याचा कारखाना उभा राहत असताना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून ती माहिती पोलिसांना का दिली नाही. ज्या जमीन मालकाच्या जमिनीवर कारखाना उभा होता, त्याचीही चौकशी करण्याची मागणी परिसरातील अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी करत आहेत.
हेही वाचा : ठाणे स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या हालचालींना वेग
काटई-बदलापूर रस्त्यावरील कुशीवली हद्दीत गुटख्याचा कारखाना सुरू आहे, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना मिळाली होती. पोलिसांनी या कारखान्याची गुप्त माहिती काढली. बुधवारी अचानक पोलीस निरीक्षक राहुल मस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार दत्ताराम भोसले, गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विश्वास माने, किशोर पाटील, रमाकांत पाटील, अनुप कामत, विलास कडू, सचीन वानखेडे, प्रशांंत वानखेडे यांच्या पथकाने गुटखा कारखान्यावर छापा टाकून तीन जणांसह सात लाखाचा विक्रीसाठी तयार असलेला गुटखा, गुटखा तयार करण्यासाठीचे सयंत्र, साहित्य असा एकूण १७ लाखाचा ऐवज जप्त केला. गुटख्यासाठीचा कच्चा माल सुरत येथून आणला होता. स्थानिकांचा या प्रकरणात सहभाग आहे का या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत. अलीकडे भिवंडी, पुणे परिसरात अधिक प्रमाणात गुटखा, अंंमली पदार्थ जप्त केली जात आहेत. त्या प्रकरणाशी या आरोपींचा संबंध आहे का याचा तपास पोलीस पथक करत आहे.