कल्याण: रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्ण महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूला रुग्णालय व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत मृत महिलेच्या नातेवाईकांनी सोमवारी रुग्णालयाची तोडमोड केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेली माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील साई संजीवनी रुग्णालयात गंगा शिंदे नावाची महिला मागील चार दिवसांपासून उपचार घेत होती. या महिलेने विष प्यायले होते. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करुन या महिलेला धोक्याच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होते.
उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्युला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे असा आरोप करत मृत महिलेच्या नातेवाईकांनी या महिलेवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांना बेदम मारहाण केली. रुग्णालयाची तोडमोड केली. ऑक्सिजनचे सिलिंडर लोटून दिले, वैद्यकीय उपकरणांची नासधूस केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने साई संजीवनी रुग्णालयात गोंधळ उडाला. उपचारी रुग्ण घाबरले. तात्काळ ही माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. तोडमोड केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.