कल्याण – पहलगान बेसरन पठारावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा कोणा एका पर्यटकावर नव्हे, तर मानव जातीवर, भारत देशावर केलेला हल्ला आहे. या नृशंस कृत्याचा जाहीर निषेध आणि याप्रकरणातील दहशतवाद्यांना कठोरात शिक्षा व्हावी, दहशतवादी प्रवृत्तीचा कायमचा सरकारने बिमोड करावा, या उद्देशातून रविवारी सकाळी हिंदू, मुस्लिम समाजातील जाणत्या मंडळींनी कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे एकत्रितपणे आत्मक्लेश उपोषण केले.
कल्याण सिटीझन फोरम या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या आत्मक्लेश उपोषणात रविवार सकाळी दहा वाजल्यापासून कल्याण शहरातील विविध स्तरातील हिंदू, मुस्लिम नागरिक येऊन सहभागी झाले. राजकीय मंडळी, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, वकील, काही जाणते नागरिक या उपोषणात सहभागी झाले होते.
कल्याण सिटीझन फोरमचे अध्यक्ष डाॅ. साद काझी, सचिव राजू गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर खराटे, अब्दुल गफ्फार शेख यांनी मौन बाळगून आणि अन्न पाण्याचा कण न घेता रविवारी सकाळपासून सात तास हे आत्मक्लेश उपोषण केले.
या उपोषणात फोरमचे प्रशांत तोष्णीवाल, राजू गवळी, रवी डोमसे, दामोदर काबरा, संंजय खंगटे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन बासरे, माजी नगरसेवक मुन्ना पांडे, असलम खोटाल, कासिफ तान्की, बब्लू अतिशखान, इफ्तिकार खान, अतुल फडके आणि इतर कल्याणकर नागरिक सहभागी झाले होते.
पहलगाम येथील हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. देशाच्या आत्म्यावर करण्यात आलेला हा हल्ला आहे. कुटुंबीयांसमोर पर्यटकांंना ठार मारण्यात आले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनांचा जगातून निषेध होत आहे. सरकार याप्रकरणी कठोर पावले उचलत आहेच, पण यासाठी धर्म, जात असा कोणताही भेद न ठेवता दहशतवादा विरुध्द देशातील नागरिकांनी संघटित होणे गरजेचे आहे म्हणून हे आत्मक्लेश उपोषण केले.
किशोर खराटे, उपोषणकर्ते.
देशात अराजक माजवणे, भेदाभेद करणे हे दहशतवाद्यांचे नेहमीच लक्ष्य राहिले आहे. सरकारने या दहशतवादी प्रवृत्तीला वेळोवेळी चोख प्रत्युतर दिले आहे. आता दहशतवादी प्रवृत्तीचा कायमचा बिमोड होणे आवश्यक आहे. यासाठी देशातील नागरिकांनी धर्म, जात, पंथ न पाहता देश म्हणून तितक्याच ताकदीने नागरिकांनी एकजुटीने राहणे आवश्यक आहे. ही एकजूटही त्या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास पुरेशी आहे.
अब्दुल गफ्फार शेख, उपोषणकर्ते.