कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका नवनियुक्त आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारून कामाला सुरूवात केली आहे. शहरातील रस्ते कामांचा आढावा घेऊन पाहाणी केली. तसेच नैमत्तिक, अर्जित रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या रजाही त्यांनी रद्द केल्या आहेत. रखडलेली विकास कामे आणि आरोग्य विषयावर सर्वाधिक भर देण्याचा मानस व्यक्त करत त्यादिशेने त्यांनी पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदी डाॅ. इंदूराणी जाखड यांची शासनाने शुक्रवारी नियुक्ती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेच्या २८ वर्षाच्या कारकिर्दीत आयुक्त पदी विराजमान होणाऱ्या डाॅ. जाखड या पहिल्या महिला आयुक्त आहेत. त्यांनी शुक्रवारी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेत कामाला सुरूवात केली. त्यांनी शहरात सुरू तसेच प्रस्तावित असलेल्या विकास कामांचा गेल्या तीन दिवसात आढावा घेतला. मागील काही महिन्यांपासून अनेक पालिका कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ची असतानाही सकाळी साडे दहा ते अकरा वाजता कार्यालयात येत होते. तो वर्ग सोमवारी सकाळी वेळेत कार्यालयात हजर होता. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी नैमत्तिक, अर्जित रजा मंजूर करून घेतल्या आहेत. त्या सर्व रजा आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून सामान्य प्रशासन विभागाने रद्द केल्या आहेत.

हेही वाचा : टीएमटीला जाहिरातींमधून मिळणार १२ कोटीचा महसुल; आठ वर्षानंतर निविदेला ठेकेदारांचा प्रतिसाद

आयुक्त डाॅ. जाखड शनिवारी पालिकेत येऊन कल्याण मधील रस्ते कामांचा आढावा घेतला. टिटवाळा ते हेदुटणे या २१ किमी बाह्यवळण रस्त्याचे काम १५ वर्षापासून सुरू असल्याचे ऐकून डाॅ. जाखड यांनी आश्चर्य व्यक्त केले. या रस्ते कामाविषयी शासन पातळीवर विचार केला जाईल, असे आयुक्तांनी सूचित केले. शहर स्वच्छता, आरोग्य विषयात कमतरता असता कामा नये, अशा इशाराही त्यांनी संबंधितांना दिला आहे. तसेच कल्याण पुर्वेतील काही रस्ते कामांचीही त्यांनी शनिवारी पाहाणी केली. विकास कामे का रखडली, हे सांगण्यापेक्षा तो विषय कसा मार्गी लागेल, यावर काम करावे. महिला बचत गटाच्या अधिकाधिक योजना राबवून हे गट सक्षम करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी दिवसभर आयुक्त जाखड यांनी पालिकेतील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडून पालिकेची आर्थिक परिस्थिती, स्वच्छता, बांधकाम, आरोग्य, प्रस्तावित विकास कामे याविषयी चर्चा केली. कल्याणमधील मधील संतोषी माता रस्त्यावरील बंगला माजी आयुक्तांकडून रिकामा होईपर्यंत मुंबईतून लोकलने कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत तेथून पालिका वाहनाने मुख्यालयात येण्याचा मनोदय डाॅ. जाखड यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

डाॅ. जाखड यांचा प्रवास

डाॅ. इंदूराणी जाखड या २०१६ च्या आयएएस तुकडीतील महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली येथे साहाय्यक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रात गृहनिर्माण विभागात साहाय्यक सचिव काम केले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.

“रखडलेले, प्रस्तावित विकास प्रकल्प मार्गी लावणे. सार्वजनिक स्वच्छता विषयांना आपले सर्वाधिक प्राधान्य असेल. नागरिकांना अपेक्षित असलेला शहर विकास सर्वांना सोबत घेऊन केला जाईल.” – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानक भागातील लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

कल्याण डोंबिवली पालिका

“कडोंमपा हद्दीत विकास कामांचा उडालेला बोजवारा, आलेले बकालपण, वाहन कोंडी, अरूंद रस्ते पाहता डाॅ. जाखड यांना राजकीय मंडळींनी तीन वर्ष किंवा त्याहून अधिक चांगले काम करू द्यावे. प्रशासनातील वाढत्या हस्तक्षेपामुळे येथे कोणी टिकत नाही”, असे डोंबिवलीतील ज्येष्ठ वकील ॲड. शिरिष देशपांडे यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan ias dr indurani jakhar has taken charge of commissioner of kalyan dombivli municipal corporation css