कल्याण : संसदेत घुसखोरी केलेल्या तरूणांनी धुराच्या नळकांड्या कल्याण शहरातून खरेदी केल्या होत्या, असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर येथील पोलिसांनी दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर प्रसारित वृत्ताच्या आधारे शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे.
कल्याण मधील अहिल्याबाई चौकातील एका फटाके विक्रेत्याची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी संसदेत वापरलेले धुराच्या नळकांड्या लहान आकाराच्या होत्या. आमच्याकडे मोठ्या आकाराच्या नळकांड्या असल्याचे दुकानदाराने पोलिसांना सांगितले. अशाच पध्दतीने इतर दुकानदारांची चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : अंबरनाथ पूर्वेत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघे जखमी; चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट दुसऱ्या मजल्यावर
संसद भवनात धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या तरूणांच्या तपासातून त्यांनी नळकांड्या कल्याण शहरातून खरेदी केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. या वृत्ताच्या आधारे पोलिसांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक स्तरावर ही चौकशी सुरू केली असल्याचे एका वरिष्ठ पोलीस सुत्राने सांगितले. अमोल शिंदे याने कल्याणमधून नळकांड्या खरेदी केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. दिल्ली तपास यंत्रणांनी याविषयी तपास करण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर आपल्या हाती माहिती पाहिजे म्हणून स्थानिक पोलिसांनी शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू केली असल्याचे समजते.
कोणत्या धूर नळकांड्या किती क्षमतेच्या असतात. त्यांच्यामुळे किती नुकसान होऊ शकते अशीही माहिती पोलीस दुकानदारांकडून घेत आहेत. यासंंदर्भात स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी याविषयी बोलण्यास तयार नाहीत. अधिक माहितासाठी साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना संपर्क साधला. ते एका कार्यक्रमात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.