कल्याण: कल्याण पश्चिमेत मुरबाड रस्त्यावरील व्हर्नन मेमोरिअल मेथडिस्ट चर्चच्या बाहेरील पदपथावर एक भंगार विक्रेती महिला आपल्या बाळासह शनिवारी रात्री झोपली होती. ही महिला गाढ झोपली असल्याचे पाहून दोन जणांनी या महिलेच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे विक्री करण्याच्या इराद्याने अपहरण केले. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी या महिलेने तक्रार करताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून बारा तासाच्या आत दोन आरोपींसह बाळाला ताब्यात घेतले.

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने याप्रकरणाचा तपास केला. आयेशा शेख ही मुळची नाशिक जवळील सिन्नर फाट्यावर झोपडपट्टीत राहते. ती भंगार जमा करण्याचे काम कल्याणमध्ये करते. तिला एक सहा महिन्याचे बाळ आहे. नेहमीप्रमाणे दिवसभर कचरा वेचून ती शनिवारी रात्री कल्याण पश्चिमेतील व्हर्नन चर्चबाहेरील पदपथावर दिव्यांच्या उजेडात झोपली होती. तिच्या कुशीत तिचे अरबाज नावाचे बाळ झोपले होते.

हेही वाचा : मुंबई महापालिकेडून ठाण्याच्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात, ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईचे संकट

मध्यरात्रीच्या सुमारास दोन जणांनी या महिलेच्या कुशीतील बाळ पाहून त्याचे विक्री करण्याच्या इराद्याने अपहरण केले. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपी उल्हासनगरमधील रहिवासी असल्याचे शोधून काढले. उल्हासनगरमधील दिनेश सरोज, अंकित कुमार प्रजापती यांनी हा अपहरणाचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना उल्हासनगरमधून अटक करून बाळाची सुटका केली. दिनेशने बाळाला आपल्या घरात ठेवले होते.

हेही वाचा : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीला बिअर पाजून लैंगिक अत्याचार

दिनेशच्या घरात पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी दिनेशची पत्नी अपहृत अरबाजला दूध पाजत होती. दिनेशला चार मुले आहेत. अरबाजचे अपहरण झाल्याने आई आयेशा रडून हैराण झाली होती. पोलिसांनी बाळ तिच्या ताब्यात देताच तिला आनंद झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.