कल्याण : ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील १४ वर्ष घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या चोरट्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या चोरट्याच्या अटकेने राज्याच्या विविध भागातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांंनी व्यक्त केली. रामनिवास उर्फ रामा मंजु गुप्ता (३७) असे आरोपीचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात राहतो. गुजरात पोलिसांंनी त्याला काही गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. तो गुजरात पोलिसांच्या तावडीतून चकवा देऊन पळून गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त

ठाणेसह मुंबई परिसरात मागील अनेक वर्ष चोऱ्या करणाऱा एक सराईत चोरटा कल्याण जवळील म्हारळ गाव परिसरात एका ढाब्यावर येणार आहे, अशी गुप्त माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्य्क पोलीस निरीक्षक दिनकर पगारे यांना मिळाली. तातडीेने वरिष्ठ निरीक्षक के. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने म्हारळ गाव परिसरात सापळा रचला. ठरल्या वेळेत आरोपी रामा गुप्ता ढाब्यावर आला. त्यावेळी पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला चित्रपटातील थराराप्रमाणे अटक केली. अटक होताच रामाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न असफल झाले. रामावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. याशिवाय विठ्ठलवाडी चार गुन्हे, मानपाडा पोलीस ठाणे तीन गुन्हे, उल्हासनगर एक, अर्नाळा पोलीस, जयपूर महेशनगर याठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan kolsewadi police arrested a thief who doing burglary since last 14 years in mumbai and thane css