कल्याण: होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. महिलांना घरबसल्या स्वत:च्या मोबाईलमधूनही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, मोबाईलमधून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता दिवसभरात नाहीच पण रात्रभर जागुनही नेट मिळत नसल्याने आणि लाडकी बहीण योजनेचे संंकेतस्थळ कोंडीने जाम होत असल्याने राज्यभरातील ग्रामीण भागातील महिला सर्वाधिक हैराण आहेत.
या योजनेचा लाभ राज्यभरातील प्रत्येक पात्र महिलेला मिळाला पाहिजे म्हणून शासनाचे अनेक विभाग सक्रिय आहेत. महापालिकांमध्ये या योजनेचे अर्ज ऑफलाईन, ऑनलाईन माध्यमातून भरून घेतले जात आहेत. नागरी सुविधा केंद्रे, महसूल विभागाची सेतू कार्यालयांमध्ये सकाळपासून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी, जमा करण्यासाठी तुडुंब गर्दी होत आहे.
हेही वाचा : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचजवळ पाणी तुंबले
ग्रामीण भागातील बहुतांशी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी तयारी केली आहे. ग्रामीण भागातील तलाठी, ग्रामपंचायत कार्यालये विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी महिलांंनी गजबजून गेली आहेत. झेराक्स केंद्र चालकांचे या योजनेमुळे कमावतीचे दिवस आले आहेत. सरकारी कार्यालयांमधील गर्दीमुळे ग्रामीणमधील अनेक महिला आपल्या परिचातांकडून मोबाईलवर हे अर्ज भरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ व्यस्त राहत असल्याने महिलांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होत नाही. अनेक वेळा नेटची सुविधा संथगतीने उपलब्ध होते. त्याचाही त्रास हा अर्ज भरताना महिलांना होत आहे.
दिवसा संकेतस्थळ व्यस्त राहून अर्ज भरण्यास उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक महिला रात्री १२ ते पहाटेपर्यंत या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी धडपडत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारासह ही या योजनेचे संकेतस्थळ व्यस्त राहत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक ग्रामीण महिलांचा हिरमोड होत आहे. लॅपटाॅप, संगणकावर हा अर्ज उघडत नसल्याचे महिलांनी सांगितले.
हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गातून उड्या
मेहनत न करता थेट बँक खात्यात दीड हजार रूपये दर महिन्याला जमा होणार असल्याने ही रक्कम मिळण्यासाठी अनेक महिला काम सोडून दिवसभर अर्ज कधी भरून होतो या विचाराने कासाविस आहेत. आता भातशेतीची कामे सुरू आहेत. त्यात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून होत नसल्याने अनेक ग्रामीण महिलांचा अर्धा जीव शेती कामात, तर अर्धा जीव अर्जात अडकून राहत आहे.
अर्ज भरण्यासाठी आम्ही मोबाईलच्या माध्यमातून दिवसा प्रयत्न करतो, पण या योजनेचे संकेतस्थळ उघडत नाही. रात्रभर जागून प्रयत्न केले तरी संंकेतस्थळ व्यस्तच असते. सरकारी कार्यालयात गेले की तेथे गर्दी असते. अनेक वेळा नेट साथ देत नाही.
यमुनाबाई वाघेरे (पात्र लाभार्थी)
सरकारने घरोघरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी पाठवून हे अर्ज भरून घ्यायला पाहिजे होते. मतदान आले की कर्मचारी कसे घरी फेऱ्या मारून कुटुंबीयांना अनेक प्रकारचा त्रास देतात. तसेच या योजनेचा लाभ पण घरी जाऊन महिलांना देणे आवश्यक होते. ही योजना राबविण्यासाठी सरकारी यंत्रणा तोकडी पडते.
श्रावणी कोर (पात्र लाभार्थी)