कल्याण : मुंबई, ठाणे, नाशिक भागात जाण्यासाठी सोईस्कर रस्ता उपलब्ध झाल्याने डोंबिवली, भिवंडी परिसराला जोडणाऱ्या डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पुलाच्या परिसरात टोलेजंग गृहसंकुले उभी राहत आहेत. काही गृहसंकुलांमध्ये सदनिका नोंदणी सुरू झाली आहे. माणकोली पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर या भागातील रखडलेल्या, वाद-चर्चेच्या भोवऱ्यात असलेल्या टोलेजंग गृहसंकुलांमधील सदनिकांना कोणीही विचारणार नाही आणि परिसरातील बांधून पूर्ण झालेल्या गृहसंकुलांना घर खरेदीदार प्राधान्य देतील, अशी भीती असल्याने काही विकासकांच्या दबावामुळे माणकोली पूल सुरू होण्यात अडथळे येत असल्याची चर्चा सुरू आहे. या विषयी उघडपणे कोणीही बोलत नसले तरी माणकोली शहर परिसरातील जाणते विकासक, वास्तुविशारद, तज्ज्ञ मंडळी गृहसंकुलांच्या सदनिका नोंदणी मधील स्पर्धा हाच पूल सुरू होण्यातील अडथळा आहे, असे सांगतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी मात्र याविषयाशी आमचा काही संंबंध नाही. आमची पुलाशी संबंधित डोंबिवली, मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली, वेल्हे गावाजवळ काही कामे सुरू आहेत. त्यामुळे माणकोली पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात विलंब होत आहे, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा : घोडबंदर मार्गावरील भीषण अपघातात नाशिकमधील एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
माणकोली पुलाच्या भिवंडी, डोंबिवली बाजुला पूल उभारणीचे काम सुरू झाल्यापासून धनदांडग्या विकासकांनी जमिनी खरेदी करून टोलेजंग गृहसंकुले, बंगले या भागात उभारणीचे काम सुरू केले. अनेक गृहप्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही गृहप्रकल्प उभारणीत अडथळे असल्याने त्यांची पूर्ण क्षमतेने उभारणी पूर्ण झाली नाही. माणकोली पूल वाहतुकीला सुरू झाला तर नव्याने उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांमधील सदनिकांची नोंदणी घर खरेदीदारांकडून तात्काळ सुरू होईल. या सदनिकांमध्ये पूर्ण क्षमतेने रहिवास सुरू झाला तर आपल्या रखडलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांना ग्राहकच मिळणार नाही, अशी भीती या भागातील काही विकासक आणि त्यांच्या राजकीय पाठीराख्यांना वाटते. त्यामुळे माणकोली पूल सुरू होण्यात प्रशासकीय, जमीन विषयक जेवढे अडथळे आणता येतील तेवढे अडथळे आणण्याचे काम डोंबिवली, भिवंडी भागातील काही मंडळी करत असल्याची विश्वसनीय मााहिती आहे.
हेही वाचा : ठाण्यासाठी गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट?
गृहसंकुलांच्या या वादाचा प्रवाशांना सर्वाधिक मोठा फटका बसत आहे. डोंबिवलीतील स्थानिक मंडळींनी अरेरावी करून पुलाच्या प्रवेशव्दाराला लावलेले अडथळे बाजुला करून वाहतूक सुरू केली आहे. डोंबिवलीतून भांडुपला, ठाणे दिशेेने दुचाकी, मोटारीने जाणारा प्रवासी २५ मिनिटात पोहचत आहेत. मुंबईत सव्वा तासात या पुलावरून प्रवासी पोहचतो. आता डोंबिवलीतील बहुतांशी प्रवासी माणकोली पुलावरून प्रवास करत आहेत. एवढी जलदगतीची सुविधा असुनही जाता येत नाही. शिळफाटा, भिवंंडी वळण रस्त्याच्या कोंडीतून सुटका करून माणकोली पूल सज्ज असताना या पुलाचे उदघाटन करण्यास राजकीय मंंडळी, शासन पुढाकार घेत नसल्याने प्रवासी तीव्र नाराज आहेत.
माणकोली पूल सुरू करण्यात या भागातील विकासकांमधील स्पर्धा कारणीभूत आहे अशी माहिती मिळत आहे. गृहसंकुलांमधील घरांच्या नोंदणीसाठी माणकोली पुलाला वेठीस धरू नये.
किशोर हिरवे, प्रवासी