कल्याण : कल्याण पश्चिम बारावे येथील घनकचरा प्रकल्पाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. आगीमध्ये कचरा केंद्रावर जमा केलेला कचरा जळून खाक झाला. या कचरा केंद्रावर कल्याण परिसरातील कचरा पालिकेकडून जमा केला जातो. या ठिकाणी कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा पद्धतीने विलगीकरण केले जाते. काही दिवसांपासून पडत असलेल्या उन्हामुळे हा कचरा वाळून गेला आहे.
या वाळलेल्या कचऱ्याला रविवारी सकाळी भीषण आग लागली. आगीमध्ये कचरा जळून खाक झाला. वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले केले. कचरा केंद्र परिसरात कर्मचारी नसल्याने जीवित हानी झाली नाही. आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. बारावी परिसरातील अनेक उंच गृह संकुलांमध्ये धूर पसरल्याने रहिवासी अस्वस्थ होते. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिका अग्निशन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा : उष्णतेचा ताप; अंबरनाथ, बदलापुरात वीज गायब, आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरीक हैराण
गेल्यावर्षी या कचरा केंद्राला भीषण आग लागली होती. कचऱ्यामधील विविध प्रकारचे घटक उन्हामुळे तप्त होतात. त्यामधून मिथेन वायू तयार होऊन अशा आगी लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा अज्ञात इसमांकडून कचऱ्यावर पेटती काडी टाकली जाते. त्यामुळे यापुढे आगीच्या घटना घडल्या आहेत.