कल्याण : कल्याण- नवी मुंबई, पनवेल, तळोजा शहरे जोडणारा कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग १२ हा महत्वाचा दुवा आहे. या मेट्रो मार्गाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. या मेट्रो मार्ग कामातील बाधित शेतकऱ्यांचा मोबदला आणि इतर अडथळे लवकर दूर करावेत. या कामाचा वेग वाढवून हे मेट्रो मार्गाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी बुधवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (एमएमआरडीए) कार्यालयात जाऊन मेट्रो अधिकाऱ्यांकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, शिळफाटा रस्ता ते काटई, कोळे, वडवली, उसाटणेमार्गे तळोजा असा कल्याण – तळोजा मेट्रोचा मार्ग आहे. हे काम आता शिळफाटा रस्त्यावर गोळवली, सोनारपाडा, मानपाडा भागात सुरू आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ही कामे शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी सुरू आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षापासून कोंडी मुक्त असलेला शिळफाट रस्ता मेट्रोच्या कामांमुळे दररोज वाहतूक कोंडीत अडकत आहे. मेट्रोची कामे शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी सुरू आहेत. या कामांमुळे रस्त्याचा भाग आक्रसला गेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुने अरूंद जागेतून वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागते. अवजड वाहने मेट्रो कामांच्या ठिकाणाहून जात असताना कोंडीत सर्वाधिक भर पडते. त्यामुळे प्रवाशांची शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोची कामे लवकर करण्याची मागणी आहे.

मेट्रो मार्गासाठी कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना त्यांचा भरपाईचा मोबदला वेळेत दिला तर जमिनीचे भूसंपादन करणे अधिकाऱ्यांना सहज शक्य होईल, अशी सूचना आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना केली. याविषयी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. कल्याण – तळोजा मेट्रो मार्ग ग्रामीण भागातून जात आहे. त्यामुळे गावच्या गावपणाला धक्का न लागता, ग्रामस्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून हा प्रकल्प कोणताही वाद न होता पूर्ण होईल यादृष्टीने विहित वेळेत पूर्ण करण्यात यावा. या कामासाठी सर्वोतपरी सहकार्य देण्याची तयारी आमदार मोरे यांनी दर्शवली.

या बैठकीच्या वेळी एमएमआरडीएचे उपाध्यक्ष अविनाश मुदगल, अतिरिक्त आयुक्त पद्माकर रोकडे, प्रकल्प अधिकारी बसवराज, डोंबिवली शिवसेना शहर सचिव संतोष चव्हाण, स्वीय साहाय्यक सतिश मोडक उपस्थित होते.