कल्याण – कल्याण जवळील आंबिवली वडवली भागातील एका मोबाईल व्यावसायिकाने कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भोईवाडा भागातील एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाने घेतलेल्या पैशांचे नियमित हप्ते मोबाईल व्यावसायिकाने फेडले नाहीत म्हणून खासगी सावकाराच्या चार समर्थकांनी व्यावसायिकाला हाॅकी स्टिक, कमरेचा पट्टा आणि वायरने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणप्रकरणी मोबाईल व्यावसायिकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
घटना घडलेले ठिकाण खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने बाजरपेठ पोलिसांनी हा गुन्हा खडकपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. राजू शिवजनम कहार (३८, रा. बिस्तुरी टाॅवर, आंबिवली, वडवली) असे तक्रारदार मोबाईल व्यावसायिकाचे नाव आहे. ओमकार भोपी, रोहन आणि दोन अनोळखी इसमांनी ही मारहाण केली आहे. पोलिसांनी खासगी सावकार कपील भोपी (रा. बैलबाजार, भोईवाडा, कल्याण पश्चिम) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल व्यावसायिक राजू कहार यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की कपील भोपी यांच्याकडून आपण व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाने घेतलेल्या पैशाचे हप्ते आपण नियमित फेडले नाहीत म्हणून ओमकार भोपी, रोहन आणि त्यांचे दोन साथीदार शुक्रवारी दुपारी आपण राहत असलेल्या आंबिवली वडवली येथील इमारती जवळ आले. त्यांनी आपल्याला घरातून बाहेर बोलविले. चारही जणांनी जबरदस्तीने एका दुचाकीवर बसवले. त्यांना खासगी सावकार कपील भोपी यांच्या बैलबाजार येथील कार्यालयात आणले. तेथे व्याजाचे हप्ते नियमित फेडले नाहीत म्हणून राजू कहार यांना ओमकार, रोहन आणि त्यांच्या दोन साथीदारांनी हाॅकी स्टीक, कमरेचा पट्टा आणि वायरने मारहाण केली. त्यांना चार तास या कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. यावेळी खासगी सावकार कपील यांनी व्यावसायिकाला शिवीगाळ केली. त्यामुळे मोबाईल व्यावसायिक राजू कहार यांनी पाच जणांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.