कल्याण : सामाजिक उपक्रमासाठी राबविण्यात आलेल्या कल्याणच्या आयमेथॉनमध्ये रविवारी पाच हजार धावपटू सहभागी झाले होते. कल्याण डोंबिवली, ठाणे मुंबईसह देशाच्या विविध राज्यांतील, विदेशातील धावपटूंचाही समावेश होता. या स्पर्धेतून मिळालेले सर्व उत्पन्न समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या सजग चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले.
कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पालिका उपायुक्त अतुल पाटील, माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, भारतीय वैद्यकीय संघटना कल्याणचे अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सजग संस्थेच्या सजिता लिमये यांनी ही आर्थिक मदत स्विकारली.
हेही वाचा : प्रेयसीला जखमी करणारा आरोपी अद्याप फरार; ठाणे पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा
दुर्गाडी चौक येथून स्पर्धेला सुरुवात झाली. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. अश्विन कक्कर, आयएमए कल्याणच्या उपाध्यक्ष डॉ.सुरेखा ईटकर, सचिव डॉ. विकास सूरंजे, वरिष्ठ सदस्य डॉ. अश्विन कक्कर, डॉ. राजेश राघव राजू, डॉ.अमित बोटकुंडले यांच्यासह कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील, सचिन सालीयन यांनी विशेष मेहनत घेतली.
हेही वाचा : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
या स्पर्धेत कल्याण, डोंबिवली, ठाणे , मुंबई परिसरासह दिल्ली, आसाम, हरियाणा, पंजाब, केरळसह केनियातील काही आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी आपल्या पथकासह ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला.