कल्याण : डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला दिवा बाजुने कोंबड्यांच्या खुराड्यासाठी बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसात हा खुराडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपर रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम बाजुला भूमाफियांनी हरितपट्ट्यावर बेकायदा बांधकाम करून तेथे एक बेकायदा बांधकाम केले होते. या ठिकाणी निवासी वस्ती सुरू करण्यासाठी भूमाफिया प्रयत्नशील असल्याचे दृश्य होते. परंतु, या बांधकामात कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांना समजताच त्यांनी या खुराड्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करून हा खुराडा तात्काळ पालिका आणि रेल्वेने तोडून टाकावा अशी मागणी केली होती. अतिशय लपूनछपून करण्यात आलेले हे बेकायदा बांधकाम ‘लोकसत्ता’ ठाणे सहदैनिकाने उघडडकीला आणले आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत आयरेगावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त, मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई

आयुक्त डाॅ.इंंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांंनी या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बुधवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम श्रीकांत पाटील या भूमाफियाने या भागातील हरितपट्टा नष्ट करून बांधला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांंगितले. या बेकायदा बांधकामाला कोपरमधील पश्चिम मंडळातील एका पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी आहेत. कोपर मधील एका स्थानिक ज्येष्ठ राजकीय नेत्याने मात्र या बेकायदा बांधकामाला कडाडून विरोध केला आहे.

उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांनीही या बेकायदा बांधकामाची पाहणी केली असल्याचे समजते. रेल्वे स्थानकाजवळ कोंंबड्याचा खुराडा सुरू झाला तर कोपर रेल्वे स्थानक भागात कोंंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी पसरेल. फलाटावर प्रवाशांना उभे राहणे मुश्किल होईल आणि परिसरातील रहिवाशांंनाही या दुर्गंधीचा त्रास सहन होणार होता.

हेही वाचा : कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना स्वताहून हे बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पालिकेकडून हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करून पाडकामाचा खर्च प्रशासन वसूल करील, अशी तंबी साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना दिली आहे. हे बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी भूूमाफियांची एक फळी गेल्या काही दिवसांंपासून सक्रिय आहे.

कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यावरील बेकायदा बांंधकाम संबंधितांंना स्वताहून काढून घेण्याची सूचना केली आहे. स्वताहून हे बांधकाम तोडले नाहीतर पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात हे बेकायदा बांधकाम भुईसपाट केले जाईल. तसे नियोजन करण्यात आले आहे.

राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan municipal corporation order to demolish illegal chicken coop near kopar railway station css