कल्याण : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजप आमदार किसन कथोरे यांनी मंगळवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मुरबाड मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा केली, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
या भेटीच्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किसन कथोरे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांचा राहत्या घरी सन्मान केला. यावेळी कथोरे यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार कथोरे नागपूर येथे आले आहेत. चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याने आणि मुरबाड मतदारसंघाचा विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केल्याने आमदार कथोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी जोरदार मागणी आमदार कथोरे समर्थकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : घाटकोपर – डोंबिवली प्रवासात रिक्षेत विसरलेला बारा लाखांचा सोन्याचा ऐवज महिलेला परत
आमदार कथोरे यांचा मंत्रिपदासाठी विचार न झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील भाजपमधील काही विरोधकांना तोंड देत आमदार कथोरे जिंकले आहेत. आमदार कथोरे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांची एक तगडी फळी मुरबाड मतदारसंघात सक्रिय होती. त्या सर्वांचे डावपेच उलटून लावत कथोरे यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे विरोधकांना दाखवून देण्यासाठी तरी आमदार कथोरे यांना मंत्रिपद देण्यात यावे असे समर्थकांंचे मत आहे. मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीतून आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विकास कामांवर चर्चा
मुरबाड-माळशेज घाट मार्गातील वाहतूक वाढली आहे. या घाटातील रखडलेले रस्ते काम मार्गी लावावे. घाटातील बोगद्याचे काम हाती घेण्यासाठी सहकार्य करावे. माळशेज घाटात पर्यटनचा विचार करून आकाश उंच भिंत (स्काय वाॅल) बांधण्यासाठी निधी, बदलापूर शहरात बाह्यवळण रस्ता, शिळफाटा काटई-नेवाळी-बोराडपाडा-म्हसा-धसई-माळशेज घाट रस्त्याला महामार्गाचा दर्जा देणे, याविकास कामांच्या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा केली, असे आमदार कथोरे यांनी सांगितले.
हेही वाचा : ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई
मुरबाड मतदारसंघातील विकास कामांचे काही महत्वाचे विषय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत. हे विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बाकी या भेटीचे अन्य कोणतेही कारण नव्हते.
किसन कथोरे (आमदार, भाजप, मुरबाड मतदारसंघ)