कल्याण : कल्याण जवळील सापर्डे परिसरात मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान गूढ हादरा बसला. या धक्क्याने काही वेळ सापर्डे परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. काही क्षण नागरिकांना भूकंप झाल्यासारखे जाणवले.
या गूढ हादऱ्याविषयी शासकीय यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत माहिती आतापर्यंत देण्यात आली नाही. मंगळवारी कल्याण मधील आधारवाडी भागात व्हर्टेक्स गृहसंकुलाला भीषण आग लागली होती. या कालावधीतच सापर्डे परिसरात जमिनीला जोरदार हादरा बसल्याचे स्थानिक रहिवाशांना जाणवले. घरांमधील नागरिक या गूढ हादऱ्याने घराबाहेर आले. नंतर हा हादरा थांबला. काही क्षण हा प्रकार घडल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा : नाराजी मोठी, तरीही आघाडी मोठी ? मुरबाड, अंबरनाथमध्ये पक्षांतर्गत नाराज निष्प्रभ
भूसुरूंगाचा हा स्फोट होता का, अशा विविध चर्चा त्यानंतर या भागात रंगल्या. सापर्डे परिसर सोडून इतर भागात हा हादरा बसल्याचे नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हा गूढ हादरा नक्की कशाचा होता, याविषयी नागरिक विविध प्रकारच्या चर्चा करत होते. या हादऱ्याविषयी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना संपर्क केला, त्यांच्याकडून संपर्काला प्रतिसाद मिळाला नाही.