कल्याण: कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना चांगली मते मिळाली. त्याचा विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका केल्या आहेत. या नेमणुका निष्ठावंत, ज्येष्ठांना डावलून करण्यात आल्याचा आरोप करत सामान्य, निष्ठावंत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनातील बंडानंतर कल्याण परिसरातील अनेक जुने निष्ठावान, ज्येष्ठ शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांना साथ दिली. अशा शिवसैनिकांना नवीन नेमणुकांमध्ये पदस्थापना देऊन त्यांचा सन्मान करणे आवश्यक होते. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांनी तीन लाख ८१ हजार मते मिळविली. त्याचा विचार करून ठाकरे गटाने आता आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकींच्या तयारीचा भाग म्हणून येथील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

हेही वाचा : डोंबिवलीतील विद्यार्थी पुष्कर ब्याडगीला एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के श्रेयांक

कल्याण पश्चिम, मुरबाड विभागासाठी ॲड. अल्पेश भोईर यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोईर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीला कोणाचा विरोध नाही, पण त्यांना टप्प्याने पदोन्न्तीने पद देणे आवश्यक होते, असे सामान्य शिवसैनिकांचे मत आहे. कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंंबरनाथ शहरासाठी जिल्हाप्रमुख म्हणून धनंजय बोडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना हे पद दिल्याचे सांगण्यात येते. नगरसेवक, विभागप्रमुख, दोनदा विधानसभा उमेदवारी, उपशाखाप्रमुख पदे धनंजय बोडारे यांनी भुषविली आहेत. आता जिल्हाप्रमुख पदही त्यांंना देण्यात आले आहे. अनेक पदे एकाच व्यक्तिला किती वेळ देणार. इतरही अनेक ज्येष्ठ कृतीशील शिवसैनिक पक्षात आहेत. त्यांचाही विचार होण्याची गरज आहे, अश मागणी सामान्य शिवसैनिक करत आहेत.

हेही वाचा : कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदनिमित्त नमाज पठण, मंदिरात प्रवेश नाकारल्याने शिवसेनेचा घंटानाद

दरेकर यांचे मताधिक्य वाढविंण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पदरात नव्याने नेमणुका टाकण्यात आल्याची चर्चा सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. ठाकरे गटाचे नेते मात्र हा आक्षेप खोडून काढतात. डोंबिवलीत अभिजीत सावंत या ज्येष्ठ शिवसैनिकाला शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी सामान्य, ज्येष्ठ शिवसैनिक कुरबुर करत आहेत. संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या नेमणुका करण्यात आल्या. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे सामान्य शिवसैनिक हाच शिवसेनेचा कणा आहे, असे सांगायचे आणि निष्ठावंत, सामान्य ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून नियुक्त्या करायच्या, यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण, मुरबाड, डोंबिवली परिसरातील नेमणुकांमध्ये लक्ष घालण्याची मागणी सामान्य शिवसैनिकांकडून केली जात आहे. अधिक माहितीसाठी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पक्षाकडून करण्यात आलेल्या नव्या नेमणुकांमध्ये कोणतीही नाराजी नाही. याऊलट पक्षाने युवा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याने शिवसैनिक आनंदात आहेत.

सदानंद थरवळ (जिल्हाप्रमुख, कल्याण जिल्हा)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan new appointments of shivsena thackeray faction displeasure among shivsena workers css