कल्याण: मुलाच्या बारावी प्रवेशाचे शुल्क भरण्यासाठी विठ्ठलवाडी येथील एका महिलेने शहाड रेल्वे स्थानकात एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. ही सोनसाखळी बाजारात विकून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून मुलाचे महाविद्यालयीन शुल्क भरण्याचे महिलेने ठरविले. पण कल्याण लोहमार्ग पोलिसांनी प्रवासी महिलेच्या दाखल तक्रारीवरून चोरट्या महिलेला विठ्ठलवाडी परिसरातून अटक केली.
राणी भोसले (४२) असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. पहिल्या पतीने घटस्फोट दिल्याने राणी भोसले हिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तिला तीन मुलगे, एक मुलगी आहे. पहिल्या पतीने दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले. आता मुलांचा सांभाळ कसा करायचा. मुलांची शिक्षणे चालू, त्यात कुटुंब गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न राणीला पडला. तिने मुंबईत येऊन मिळेल ते काम करण्याची तयारी केली. ती विठ्ठलवाडी येथे अलीकडेच आपल्या भावाकडे मुलांना घेऊन आली. ती मिळेल ते काम करून उपजीविका करत होती. दरम्यान ती आजारी पडली. आजारासाठी पैसे नव्हते. तिला उपचारासाठी ग्रँट रोडला जावे लागत होते. मिळालेल्या मजुरीतून ती भावाकडे राहून घरगाडा चालवित होती.
हेही वाचा : उल्हासनगरमध्ये गणपती आगमन मिरवणुकीची परवानगी न घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळावर गुन्हा
ग्रँट रोडला गेली असताना राणीला तिच्या बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलाचा फोन आला. आपणास बारावीचे महाविद्यालयीन शुल्क भरणा करायचे आहे. त्यासाठी पैसे लागतील. मुलाला पैसे कोठुन द्यायचे असा प्रश्न राणीला पडला. ग्रँट रोडवरून लोकलने परत येत असताना राणीच्या मनात लोकलमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मिळेल तो सोन्याचा ऐवज चोरण्याचा विचार आला. त्याप्रमाणे शहाड रेल्वे स्थानकात राणीने धाडस करून लोकलमध्ये चढत असलेल्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही सोनसाखळी विकून आपण मुलाचे बारावीचे महाविद्यालयीन शुल्क भरू असा विचार ती करत होती.
हेही वाचा : सीएसएमटी – दिवा लोकलसाठी दिवेकरांचे हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन
मुलाच्या महाविद्यालयीन शुल्काचा विषय मिटला असे वाटत असतानाच, प्रवासी महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात शहाड रेल्वे स्थानकात आपली सोनसाखळी एका महिलेने चोरली असल्याची तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तात्काळ तपास पथके तयार केली. शहाड आणि लगतच्या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी चोरटी महिला विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात उतरून पसार झाली असल्याचे पोलिसांना दिले. पोलिसांनी विठ्ठलवाडी भागात शोध घेऊन राणी भोसलेचा तपास काढला. तिला अटक केली. मुलाच्या शालेय शुल्कासाठी आपण ही चोरी केली आहे, अशी कबुली राणीने लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.