कल्याण – तुमचा मुलगा दहावी नापास झाला असला तरी त्याची बनावट गुणपत्रिका तयार करून त्याला आपण मुथा महाविद्यालयात प्रवेश घेऊन देऊ, असे तीन जणांनी एका विद्यार्थ्याच्या पालकाला सांगितले. यानंंतर आपण तयार केलेली बनावट गुणपत्रिका आणि ती तयार करणारा इसम पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणात आपल्या मुलाचे गुणपत्रिकेवर नाव आहे. पोलीस कारवाईपासून वाचविण्यासाठी तीन जणांनी पालकाकडून १२ लाख २० हजार रूपये उकळले. त्यानंतर प्रवेश नाहीच, पण १२ लाख उकळून तीन जणांनी आपली फसवणूक केली म्हणून पालकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी तक्रार केली आहे.

साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी अशाप्रकारची तक्रार दाखल आहे. याप्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिसांनी सुरू केला आहे, असे सांगितले. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

या फसवणूप्रकरणी कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात राहणारे व्यापारी शांतिलाल मगनलाल पटेल यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात क्रिश गुप्ता, साक्षी उर्फ मोन्टी गुप्ता आणि पोकर या तीन इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

शांतिलाल पटेल यांनी प्राथमिक तपासणी अहवालात दिलेली माहिती आणि साहाय्यक पोलीस आयुक्त घेटे यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी, की शांतिलाल पटेल यांचा मुलगा सेजल पटेल हा इयत्ता दहावीची परीक्षा नापास झाला होता. त्याला नापास गुणपत्रिकेवर महाविद्यालयात प्रवेश मिळणे शक्य नव्हते. या कालावधीत गु्न्हा दाखल इसम क्रिश, साक्षी आणि पोकर हे शांतिलाल पटेल यांच्या संपर्कात आले. मुलाच्या नापास होण्याचा आणि त्याच्या प्रवेशाचा विषय शांतिलाल यांनी या तिघांजवळ काढला.

तिन्ही इसमांनी शांतिलाल पटेल यांना दिलासा देत तुमचा मुलगा दहावी नापास झाला असला तरी त्याचे आपण दहावी पास झाले असल्याची बनावट गुणपत्रिका तयार करू. त्या आधारे त्याला आपण मुथा महाविद्यालयात प्रवेश घेऊन असे आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साक्षी, क्रिश आणि पोकर यांनी सेजल पटेलच्या नावाची दहावीची बनावट गुणपत्रिका तयार केली. या गुणपत्रिकेच्या आधारे सेजलला महाविद्यालयात प्रवेशाची तयारी करण्यात आली.

दरम्यानच्या काळात तिघांनी शांतिलाल पटेल यांना सांगितले, आपण जी तुमच्या मुलाची बनावट गुणपत्रिका तयार केली होती. त्यासह ही गुणपत्रिका तयार करणारा इसम पोलिसांनी पकडला आहे. या गुणपत्रिकेवर तुमच्या मुलाचे नाव आहे. आता पोलीस तक्रार होऊन तुमचा मुलगाही अडचणीत येईल. या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आपणास पैसे लागतील, अशी भीती घालून गुन्हा दाखल तिन्ही इसमांनी पटेल यांच्याकडून १२ लाख २० हजार रूपये उकळले. आपल्या मुलाचा प्रवेश नाहीच पण पुढे कोणतीही प्रक्रिया न झाल्याने शांतिलाल पटेल यांना या तिघांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.