लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: शिळफाटा रस्त्यावर आणि निळजे रेल्वे स्थानक परिसरात कोठेही प्रशस्त वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतूक विभागाने लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सम, विषम तारखेला वाहन चालकांना वाहने उभी करण्यासाठी मोकळीक दिली आहे.

प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा गृहसंकुल, २७ गाव परिसरातील बहुतांशी नोकरदार वर्ग निळजे रेल्वे स्थानकातून मुंबई, पनवेल दिशेने जातो. हा वर्ग दुचाकी वाहनाने रेल्वे स्थानक भागात येतो. तेथील रस्ता, गल्ली बोळात वाहने उभी करुन हा वर्ग निघून जातो. पुन्हा संध्याकाळी कामावरुन परतल्यावर नोकरदार वर्ग वाहने घेऊन निघतात.

हेही वाचा… डोंबिवलीत भट्टीतील कोळसा अंगावर उडून सहा कामगार जखमी

रेल्वे स्थानक परिसरात ही वाहने उभी करुन ठेवण्यात येत असल्याने अनेक वेळा या भागात वाहन कोंडी होते. काही अवजड वाहने या भागात आल्यावर ही वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्यावरील वाहने उभारणीत सुसूत्रता असावी. रस्त्यावरील वाहनांमुळे वाहन कोंडी होऊ नये या उद्देशातून वाहतूक विभागाने पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत सम, विषम तारखेला वाहने उभी करण्याचा प्रायोगिक तत्वावर पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाण्यात होणार आंबा महोत्सव

पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकालगत दोन्ही बाजुला १.८ किलोमीटर अंतरावर सम, विषम तारखेला वाहन चालकांना वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाहन चालकांनी या आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या अधिसूचनेसंदर्भात कोणा नागरिकाला हरकत असल्यास त्यांनी वाहतूक विभागाच्या ठाणे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

हेही वाचा… ठाण्यात ‘ठाणे ईट राईट मिलेट’ मेळावा; भरड धान्याचा आहारात समावेश करण्याबाबत होणार जनजागृती

डोंबिवली परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये, वाहने, व्यापारी संकुले, बाजारपेठा वाढत आहेत. त्या प्रमाणात वाहनतळांच्या सुविधा नसल्याने रेल्वे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठा परिसरांमध्ये वाहन कोंडी होणार नाही. नागरिकांना त्रास होणार नाही या विचारातून मुख्य रस्त्यांवर सम, विषम तारखांचे नियोजन केले जात आहे, असे डाॅ. राठोड यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan parking facility on shilphata road from palawa chowk to nilje railway station on odd and even dates dvr
Show comments