कल्याण : दिवसेंदिवस कल्याण रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. याविषयी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री तीन जणांनी नाशिक येथून आलेल्या एका प्रवाशाला कल्याण रेल्वे स्थानका बाहेर पकडून बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील मोबाईल फोन आणि पाच हजार रूपये जबरदस्तीने काढून पळ काढला.
एका प्रवाशाला जमिनीवर पाडून मारहाण केली जात आहे हे लक्षात आल्यावर इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली म्हणून जखमी प्रवाशाची सुटका झाली. लोहमार्ग पोलिसांनी सांगितले, भालचंद्र मथुरे हे नाशिक येथून देवदर्शन करून सोमवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. रेल्वे स्थानकातून बाहेर पडून ते घरी जाण्यासाठी रिक्षा पाहत होते. त्यावेळी तीन जणांनी मथुरे यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांना अचानक बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत मथुरे जमिनीवर पडले. तरीही तिन्ही चोरटे त्यांना बेदम मारहाण करत होते. या मारहाणीत चोरट्यांनी मथुरे यांच्या जवळील पाच हजार रूपये आणि मोबाईल घेऊन पळ काढला. मारहाण सुरू असताना इतर प्रवासी मथुरे यांच्या बचावासाठी पुढे आले. तेव्हा चोरट्यांनी पळ काढला.
मथुरे यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या गुन्ह्यात हर्षल कदम या आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर रात्रीच्या वेळेत प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वेळा रात्रीच्या वेळेत पोलीसच प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर पडताना काळजी घ्या, अशा सूचना देतात.