कल्याण : गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे शुक्रवारी सकाळी डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकल कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुड फ्रायडेनिमित्त सरकारी सुट्टी असली तरी खासगी क्षेत्रात काम करणारा नोकरदार वर्ग सर्वाधिक संख्येने आहे. हा वर्ग सुट्टी असली तरी नियमित वेळेत कामावर जातो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे नोकरादार वर्ग डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर सकाळची ८.१४, ८.४१ ची डोंबिवली सीएसएमटी लोकलने जाण्यासाठी उभा होता. परंतु, या दोन्ही लोकल रद्द करण्यात आल्याची उद्घोषणा आयत्यावेळी करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अखेर फलाट क्रमांक तीन, पाचवर जाऊन प्रवाशांना मुंबईचा प्रवास करावा लागला.
हेही वाचा : तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
ही माहिती रेल्वेने अगोदरच दिली असती तर आम्ही फलाट क्रमांक दोनवर थांबलोच नसतो. आमचा दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ तेथे न दौडता आम्ही इतर लोकलने प्रवास केला, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या. अशाच पध्दतीने कल्याणला जाणारी सकाळची ८.२७ ची लोकल रेल्वेने रद्द केली. सकाळच्या तीन लोकल पाठोपाठ रद्द केल्याने प्रवाशांचा तिळपापड झाला होता. अगोदरच उकाड्याने हैराण झालेले प्रवासी लोकल रद्द झाल्याने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने संतप्त झाले होते. महिला प्रवासी या सगळ्या प्रकाराविषयी रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत होत्या.
हेही वाचा : कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांच्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला पोलिसांची हरकत
अलीकडे खासगी क्षेत्रात काम करणारा वर्ग सर्वाधिक मोठा आहे. त्यामुळे सरकारी सुट्टी असली तरी नियमितच्या संख्येने नोकरदार वर्ग कामासाठी घराबाहेर पडतो. याचे भान रेल्वे प्रशासनाने ठेवावे आणि सार्वजनिक सुट्टीचा विचार करून सुट्टीच्या दिवशी धडाधड लोकल रद्द करू नयेत, अशी मागणी उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.
सार्वजनिक सुट्टी असली तरी अलीकडे खासगी कार्यालयात जाणारा नोकरदार वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे हा वर्ग सुट्टी असली तरी आपल्या नियमितच्या वेळेत लोकलने प्रवास करत असतो. त्यामुळे सुट्टी आहे म्हणून मध्य रेल्वेने लोकल रद्द करू नयेत.
लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघ, डोंबिवली.