कल्याण : मुळचे भिवंडी जवळील वडपे गावचे रहिवासी असलेले आणि आता ठाणे येथे राहत असलेल्या साईनाथ तारे या शिवसैनिकाला डामडौलात मंगळवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षात प्रवेश दिल्याने खळबळ उडाली आहे. साईनाथ तारे यांच्यावर काही वर्षापूर्वी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. याची कबुली स्वतः तारे यांनी दिल्याने लैंगिक अत्याचारी शिवसैनिकाला उध्दव ठाकरे यांनी पक्षप्रवेश दिलाच कसा, असा प्रश्न आता शिवसेना शिंदे गट आणि विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
याविषयी ठाकरे गटाचे पदाधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत. हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. त्यांना पक्षात घ्यावे म्हणून कोणीही पक्षप्रमुखांच्याकडे शिफारस केली नव्हती, असे ठाकरे गटाचे कल्याणमधील स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत. बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर लैंगिक अत्याचारी आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी सर्वस्तरातून मागणी होत असताना, ठाकरे गटाने मात्र बलात्काराचा गुन्हा असलेल्या साईनाथ तारे यांना पक्षात प्रवेश दिल्याने शिवसेनेसह विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण शहराविषयी तारे यांची कोणतीही नाळ नव्हती. त्यामुळे कल्याण शहराशी त्यांचा फार संबंध नव्हता, असे शिवसैनिक सांगतात. काँग्रेसच्या मागे फरफटत जात असलेल्या उध्दव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाबरोबर नैतिकताही सोडली असल्याची टीका शिवसेनेकडून होत आहे. मातोश्रीवरील तारेंच्या पक्षप्रवेशासाठी जिल्हाध्यक्ष विजय साळवींव्यतिरिक्त कोणीही ठाकरे गटाचा कल्याणचा पदाधिकारी नव्हता, असे शिवसैनिक सांगतात. साळवी यांना संपर्क केला, तो होऊ शकला नाही.
हेही वाचा : डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
साईनाथ तारे हे शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांचे खास निकटवर्तिय. त्यांच्या जोरावर तारे यांनी पत्नी मनीषा तारे यांना वायलेनगर मधून नगरसेविका म्हणून निवडून आणले होते. शिवसेना शिंदे गटाचे ते ग्रामीण प्रमुख होते. धनवान असल्याने तारे यांना आता कल्याण पश्चिमेतून आमदार होण्याची इच्छा झाली आहे. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात उडी मारली आहे, असे शिवसैनिक सांगतात.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेने त्यांच्या विरुध्द लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. याची कबुली स्वता तारे यांनी माध्यमांना दिली आहे. न्यायालयात हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आल्याचे ते सांगतात. तीन वर्षापूर्वी खडकपाडा भागात कल्याण डोंबिवली पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांना एका बँकेच्या एटीएम समोर तारे यांनी धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी त्यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण
साईनाथ तारेंकडे कोणतेही पद नव्हते. ते शिवसेनेत कार्यरत नव्हते. ते मुळचे भिवंडीचे. आता ठाण्यात राहतात. त्यामुळे कल्याण शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्राशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता.
विश्वनाथ भोईर (आमदार, शिवसेना)
बलात्काराचा गुन्हा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना तारे यांना पक्षात प्रवेश देऊन उध्दव ठाकरेंनी काय दाखविले. उद्या बदलापूरच्या आरोपीला पक्षात घेतले तरआश्चर्य नको. अशा लोकांना पक्षात घेत राहिला तर ठाकरे पक्षाला बलात्कारी सेना बोलायला लोक कमी पडणार नाहीत.
मनीषा कायंदे (आमदार, शिवसेना)