कल्याण: सोसायटीच्या प्रवेशव्दारावर काम करणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांचे पंधरा दिवसांचे वेतन रखडून ठेवले म्हणून संतप्त झालेल्या एका सुरक्षा रक्षकाने बलदंड (बाऊन्सर) सात सुरक्षा रक्षक सोबत घेतले. कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ येथील वेतन रखडविणाऱ्या सुरक्षा प्रमुखाच्या मंगेशी संस्कार सोसायटीत येऊन मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप लावून सोसायटीतील रहिवाशांंना वेतन मिळत नाही तोपर्यंत कोंडून ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सगळ्या प्रकाराने मंगेशी संस्कार सोसायटीसह परिसरातील सोसायटीतील सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सोसायटीतील सुरक्षा रक्षकांच्या रखडलेल्या वेतनाचा राग सोसायटीतील सदस्यांवर त्यांना कोंडून ठेऊन का काढता, असा प्रश्न सदस्यांनी आरोपींना केला. यावेळी सदस्य आणि वेतन रखडलेल्या सात बलदंड सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सोमवारी सकाळी साडे सात ते साडे नऊ या रहिवाशांंना कामावर जाण्याच्या, मुलांना शाळेत जाण्याच्या वेळेत सुरक्षा रक्षकांनी हा संतापजनक प्रकार केला.

हेही वाचा : पत्रीपुलावर नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाची बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

याप्रकरणी मंगेशी संस्कार सोसायटीत राहणारे, सुरक्षा एजन्सी चालविणाऱ्या गणेश धोंडू तिखंडे (३९) यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी बलदंड खासगी सुरक्षा रक्षक (बाऊन्सर) राजन शामसुंदर तिवारी (रा. महेक रेसिडेन्सी, नांदिवली तर्फ, कल्याण पूर्व) आणि त्यांचे सात सहकारी सुरक्षा रक्षक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार गणेश तिखंडे हे सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याचा व्यवसाय करतात. त्यांची एक खासगी एजन्सी आहे. तिखंडे हे मंंगेशी संस्कार सोसायटीत राहतात. त्यांनी राजन तिवारी यांच्या सुरक्षा रक्षकांचे पंधरा दिवसांचे वेतन रखडून ठेवले आहे. वारंवार मागणी करूनही गणेश तिखंडे रखडलेले वेतन देत नव्हते. त्यामुळे राजन तिवारी यांचा राग अनावर झाला. त्यांनी सोमवारी सकाळी आपल्या सोबत वेतन रखडलेले सात बलदंड (बाऊन्सर) सुरक्षा घेतले. ते सोमवारी सकाळीच गणेश तिखंडे राहत असलेल्या मंगेशी संस्कार सोसायटीत पोहचले. तेथे त्यांनी गणेश यांच्याकडे रखडलेले वेतन देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

हेही वाचा : ठाणे: देहविक्री करणाऱ्या महिलांचा उद्योजकतेकडे प्रवास

वेतन मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर राजन तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगेशी संस्कार सोसायटीचे रहिवाशांना येण्या जाण्यासाठी असलेले मुख्य प्रवेशव्दार कुलुप लावून बंद केले. जोपर्यंत तुम्ही सुरक्षा रक्षकांचे वेतन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही कुलूप काढणार नाही, अशी धमकी राजन तिवारी यांनी गणेश यांना दिली.

सुरक्षा रक्षकांच्या या वादात रहिवासी सोसायटीत अडकून पडले. अनेकांना कामावर जाण्याची, काहींना मुलांना शाळेत जाण्याची घाई होती. सकाळी साडे सात ते सकाळी साडे नऊ असा दोन तास हा गोंधळ चालू होता. या कालावधीत रहिवासी सोसायटीत अडकून पडले होते. अखेर तोडगा काढल्यानंतर कुलूप काढण्यात आले. सोसायटीतील रहिवाशांना नियमबाह्यपणे कोंडून ठेवल्याने गणेश तिखंडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. साळवे तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan residents of mangeshi sanskar society locked up by security guards for pending salary css