कल्याण: पावसाळ्यापूर्वीच मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा, वासिंद ते शहापूर परिसरातील रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल, रस्ते कामे पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चालढकलपणा करण्यात आला. त्याचा फटका आता प्रवाशांना कोंडीच्या माध्यमातून बसण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी राज्याचे निवृत्त मुख्य सचिव डाॅ. नितीन करीर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर भागातील कोंडीमुळे कसारा ते ठाणे, मुंबई लोकलने प्रवास करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे निवृत्त मुख्य सचिव डाॅ. नितीन करीर शनिवारी प्रशासकीय कामानिमित्त नाशिक येथे रविवारी गेले होते. रविवारी डाॅ. करीर शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे आपल्या पदाचा पदभार त्यांना नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या सुजाता सौनिक यांना रविवारी दुपारी द्यायचा होता. यावेळी डाॅ. करीर यांच्या निरोपाचा कार्यक्रम सनदी अधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. रविवारी दुपारी कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयात पोहचणे डाॅ. करीर यांना आवश्यक होते.

हेही वाचा : घोडबंदरचा ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्यासाठी रहिवाशांची एकजूट; आंदोलनात पर्यावरणवादी सहभागी

नाशिक येथून मुंबईत परत येत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर ते वासिंद, पडघा भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. या भागात वाहनांचा रांगा लागल्या असल्याची आगाऊ माहिती वाहतूक विभाग, पोलिसांकडून डाॅ. करीर यांना देण्यात आली. अशी कोंडी असेल तर मुंबईत मंत्रालयात वेळेत पोहचणे शक्य होणार नाही, असा विचार करून डाॅ. करीर यांनी आपल्या शासकीय वाहनांचा ताफा कसारा रेल्वे स्थानकाकडे वळविला. कसारा लोकलने मुंबईत येणे पसंत केले. या कालावधीत ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. अशोक शिनगारे डाॅ. करीर यांच्या कसारा रेल्वे स्थानकातील स्वागतासाठी कसारा येथे पोहचले.

वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा आणि रडतखडत कोंडीतून प्रवास करण्यापेक्षा निवृत्त मुख्य सचिव डाॅ. नितीन करीर यांनी कसारा येथे येणे पसंत केले. तेथून रेल्वे प्रवासाची तिकिटे काढून कसारा लोकलने मुंबई येथे येणे पसंत केेले. रविवारी दुपारी दीड वाजताच्या कसारा लोकलने कसारा रेल्वे स्थानकातून या दोन्ही सनदी अधिकारी, त्यांचे स्वीय साहाय्यक आणि सुरक्षा रक्षकांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला.

हेही वाचा : ठाणे : येऊरमध्ये क्रिकेटप्रेमींचा धिंगाणा; गोंगाटाविरोधात आदिवासी, पर्यावरणवाद्यांचे आंदोलन

ज्या प्रवासासाठी या दोन्ही सनदी अधिकाऱ्यांना रस्ते मार्गावरील प्रवासासाठी खड्ड्यातून, कोंडीतून दोन ते तीन तास लागणार होते, तोच प्रवास त्यांनी लोकलमधून समाधानाने केला. दुपारची वेळ असल्याने लोकलमध्ये गर्दी नव्हती. कसारा लोकलचा मुंबईपर्यंतचा प्रवास दोन तासात पूर्ण होतो. सनदी अधिकाऱ्यांना खड्डे, कोंडीमुळे आपला रस्ता बदलावा लागला. तर या महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांंचे किती हाल होत असतील याचा विचार महामार्ग प्राधिकरणाने करावा. या रस्त्यांवरील कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मुंबईत पोहचल्यावर डाॅ. करीर मंत्रालयातील सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

हेही वाचा : कल्याणमध्ये नांदिवलीतून अल्पवयीन गुराख्याचे अपहरण

शहापूर जवळील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम मागील तीन वर्षापासून रखडले आहे. या रखडलेल्या पुलामुळे जड, अवजड, सर्व प्रकारची वाहने एकाच मार्गिकेतून धावतात. त्याचा फटका शहापूर परिसरातून महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांना बसत आहे. या कोंंडीमुळे महामार्गालगतच्या नागरिकांना महामार्गावर येऊन तेथून पुढचा प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. याचा सर्वाधिक फटका नोकरदार, विद्यार्थी यांना बसला आहे.