कल्याण : सत्व, निस्वार्थीपणा, राष्ट्र उन्नत्ती आणि सहकार भावनेतून समाज विकास समोर ठेऊन, सर्व आर्थिक मापदंड समोर ठेऊन दुर्बलांचे आर्थिक उत्कर्ष हेच बँकांचे अधिष्ठान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी शनिवारी येथे कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाच्या कार्यक्रमात केले. विविध प्रकारचे ग्राहक हित, समाज उन्नत्तीचे आर्थिक निकष पाळत कल्याण जनता बँकेने ही भरारी घेतली आहे. त्यामुळे ही बँक कौतुकाला पात्र ठरते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मागील वर्षी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सांगता शनिवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी डाॅ. भागवत यांनी जनता, सहकारी बँकांचे कार्य तसेच समाज एकसंध बांधून ठेवण्याचे बँका हे कसे महत्वाचे साधन आहे. या माध्यमातून आपण समाज विकासबरोबर राष्ट्र उन्नत्तीकडे कसे जाऊ शकतो, अशा अनेक महत्वाच्या विषयांना स्पर्श केला.
सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांंगता झाली म्हणजे पुढील काळात संस्था अधिक गतिमानतेने कशी चालेल हे बघण्याची जबाबदारी वाढते. यामध्ये संचालक मंडळ, कर्मचारी यांचे सात्विक, निस्वार्थी योगदान खूप मोलाचे असते. एखादी संस्था ५० वर्षाची वाटचाल करते म्हणजे सर्व कसोट्या, पायऱ्या पार करत ती यशाच्या एका टप्प्यावर आलेली असते. निस्वार्थीपणा, सत्व, संकल्पामागे विचारांचे अधिष्ठान या महत्वाचे घटक या पायऱ्यांवर आहेत. बँक आर्थिक जगतामधील महत्वाचा उपक्रम, सहकारी जगतामधील व्यवसाय आहे. धर्माच्या मुळाशी अर्थकारण असले पाहिजे. सृष्टी, लोकांकडून आपण कमवितो तर ते पुन्हा जनहितासाठीच गेले पाहिजे, हा भाव अर्थकारणात खूप महत्वाचा आहे, असे डाॅ. भागवत यांनी सांगितले.
हेही वाचा : कल्याण : मुरबाडमध्ये पंचायत समिती माजी सभापतीकडून तरूणाची हत्या
सहकारी बँकेमध्ये सेवाचा भाव असतो. दुर्बल घटकांच्या गरजा ओळखून त्यांना वित्त पुरवठा करून त्यांना सुस्थितीत आणणे. यामधून विकासाची साखळी तयार होते. या साखळीतील बँक चालविणारा प्रत्येक घटक राष्ट्र उन्नत्तीमध्ये आपले योगदान देत असतो. सर्व प्रकारचे आर्थिक मापदंड पाळून कल्याण जनता बँकेने ही वाटचाल केली आहे. येत्या काळात सर्व प्रकारची सत्व सांभाळून जनसेवेची बँकेच ही वाटचाल सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुवर्ण बंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष सनदी लेखापाल सचीन आंबेकर, व्यवस्थापकीय संचालक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.