कल्याण – मागील ४० वर्षांपासून कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेचे निष्ठावान सैनिक म्हणून काम करून या भागातील शिवसेनेचे संघटन मजबूत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे सागाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश गोविंद म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘उबाठा’कडून काढून घेण्यात आल्याने कल्याण ग्रामीण शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिवसेनाप्रमुख, जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून डोंबिवली जवळील २७ गावे, मलंगवाडी पट्ट्यात शिवसेनेच्या गावोगावी शिवसेना शाखा काढण्यात प्रकाश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. ते उपजिल्हाप्रमुख म्हणून उबाठा पक्षाचे आता कल्याण ग्रामीणमध्ये काम पाहत होते. पत्नी प्रेमा म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेत सागाव परिसराचे नेतृत्व केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कल्याण, डोंबिवलीतील अनेक शिवसैनिक शिंदे यांच्या सोबत गेले. पण निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रकाश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे नाकारले. म्हात्रे यांंनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून गेल्या दीड वर्षात शिंदे गटाकडून अनेक आयुधे म्हात्रे यांच्यासाठी चालविण्यात आली. ते सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असल्याने मंदिराच्या कामकाजात अडथळे आणण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आले. अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.
मागील सात महिन्यांपासून प्रकाश म्हात्रे उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांना आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट घालून द्यावी अशी मागणी करत आहेत. याविषयी स्थानिक, वरिष्ठ पातळीवरून कोणतेही निरोप मिळत नसल्याने म्हात्रे गटात अस्वस्थता होती. शिवसेना फुटीनंतर दीड वर्षाच्या कालावधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधी कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे फिरकले नाहीत. युवा नेते आदित्य यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. गेल्या आठवड्यात पक्षप्रमुखांनी धावता दौरा करून शिवसैनिकांना धीर दिला. उद्धव ठाकरे यांच्या आगमनाने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद मात्र त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, चर्चा न करता मातोश्रीवरून काढण्यात आले. या प्रकाराने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख पद आता देसई गावचे मधुकर पाटील यांना देण्यात आले आहे. ते या भागाचे उबाठाचे पदाधिकारी आहेत.
माझ्याकडील पद काढले असले तरी मी नाराज नाही. शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. – प्रकाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक, सागाव, डोंबिवली.
आगामी निवडणुकींचा विचार करून नव्या मंडळींना पक्षप्रमुखांनी संधी दिली आहे. या बदलामुळे पक्षात कोणीही नाराज नाही. – सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख, कल्याण लोकसभा.