कल्याण : आपल्या भावाला परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे, असे सांगून आपल्या शेजारी राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या वायरमनकडून एक महिलेने साडे पाच लाख रूपये वसूल केले. त्यानंतर आपणास लग्नाला जायचे आहे असे सांगून या वायरमनच्या पत्नीकडील २१ तोळ्याचे दागिने महिलेने स्वतः च्या घरी नेले आणि ते परस्पर गहाण ठेवले. पैसे आणि दागिने असा एकूण १३ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज परत देण्यास आरोपी महिला तयार नसल्याने वायरमनने बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली आहे.
वासुदेव आत्माराम गुडदे (६१) असे फसवणूक झालेल्या वायरमनचे नाव आहे. ते पत्नी, मुलांसह कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील भोईवाडा भागात राहतात. सुजाता नरेश ढोमसे असे आरोपी महिलेचे नाव आहे. त्या गुडदे यांच्या शेजारी राहतात. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार गुडदे आणि आरोपी ढोमसे हे भोईवाडा भागात शेजारी राहतात. गुडदे हे खासगी विद्युत जोडणी, तांत्रिक कामे करतात. सात वर्षापूर्वी आरोपी सुजाता ढोमसे तक्रारदार गुडदे यांच्या घरी आल्या. माझ्या भावाला परदेशात शिक्षणासाठी जायाचे आहे. यासाठी मला एकूण साडे पाच लाख रुपयांची अत्यंत गरज आहे, असे सांगितले. शिक्षणाचे काम आहे म्हणून गुडदे यांनी विश्वासाने आपल्या बँक खात्यामधील ठेव रकमेतील पाच लाख ५० हजार रूपयांची रक्कम आरोपी ढोमसे यांना दिली.
हेही वाचा : ठाण्यात पदोपदी मृत्यूचे सापळे
भाऊ विदेशातून परत आला की तुमची रक्कम तुम्हाला परत करू, असे आश्वासन सुजाता यांनी गुडदे यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी सुजाता तक्रारदार गुडदे यांच्या घरी आल्या. त्यांनी वासुदेव गुडदे यांच्या पत्नी कीर्ती यांना मला एका लग्नाला जायाचे आहे. तेथे घालण्यासाठी आपले दागिने द्या. असे सांगून कीर्ती यांच्याकडून सोन्याची अंगठी, बांगड्या, मंगळसूत्र, हार असा एकूण २१ तोळ्याचा ऐवज नेला. दोन दिवसांनी वासुदेव यांच्या पत्नीने दागिने सुजाता यांच्याकडे दागिने परत मागितले तर त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्या. सुजाता यांनी आपले दागिने कल्याण मधील हाजारीमल भगवानजी जवाहिऱ्याकडे गहाण ठेवल्याचे समजले.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचे पिंपळोलीवाडी होणार मधाचे गाव, खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून प्रक्रिया सुरू
सुजाता ढोमसे आपल्याशी बनावट व्यवहार करत आहेत हे लक्षात आल्यावर गुडदे यांनी विदेशी शिक्षणासाठी घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावला. यावेळी गुडदे यांना सुजाता यांचा कोणताही नातेवाईक परदेशात शिक्षणासाठी गेला नसल्याचे समजले. आपल्याशी खोटे बोलून सुजाता यांनी आपल्याकडून पैसे, दागिने घेतले आहेत. त्यांनी आपल्या पैसे, दागिन्यांचा स्वताच्या स्वार्थासाठी वापर केला आहे. हे लक्षात आल्यावर वासुदेव गुडदे यांंनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.